नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकांचा संताप; फायरिंग आदेश देणाऱ्या DSPला ठार, २२ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकांचा संताप; फायरिंग आदेश देणाऱ्या DSPला ठार, २२ जणांचा मृत्यू
नेपाळमध्ये भ्रष्टाचार आणि सोशल मीडिया बंदीविरोधी आंदोलन हिंसक झाले आहे. फायरिंगचे आदेश देणाऱ्या DSPला आंदोलकांनी ठार मारले. आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू तर ४०० हून अधिक जखमी झाले आहेत.
सायली मेमाणे
पुणे १० सप्टेंबर २०२५ : काठमांडू : नेपाळमध्ये सुरु असलेले कथित भ्रष्टाचारविरोधी आणि सोशल मीडियावरील बंदीविरोधातील आंदोलन आता अत्यंत भीषण वळणावर पोहोचले आहे. राजधानी काठमांडूसह देशभरात रस्त्यावर उतरलेल्या तरुणांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत उग्र निदर्शने केली. या आंदोलनाचा कळस असा झाला की, निदर्शकांवर गोळीबार करण्याचे आदेश देणाऱ्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याला आंदोलनकांनी बेदम मारहाण करून ठार केले.
मिळालेल्या माहितीनुसार, या डीएसपीच्या आदेशानंतर पोलिसांनी निदर्शकांवर केलेल्या गोळीबारात तब्बल १९ जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संतप्त झालेल्या आंदोलनकांनी थेट त्या अधिकाऱ्याला लक्ष्य केले. त्याला मारहाण करून ठार केल्यानंतर आंदोलनाचा हिंसाचार आणखीनच वाढला. यानंतर देशभरात परिस्थिती हाताबाहेर गेली असून प्रशासनाला तातडीने कठोर पावले उचलावी लागली.
आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार, या आंदोलनात २२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ४०० हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींमध्ये आंदोलकांसोबतच पोलिसांचा देखील समावेश आहे. राजधानी काठमांडू आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणावर संघर्ष, जाळपोळ आणि तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे.
निदर्शकांनी सरकारविरोधी संताप व्यक्त करत संसद भवनालाही आग लावली. एवढेच नव्हे तर त्यांनी पंतप्रधान केपी शर्मा ओली, राष्ट्रपती रामचंद्र पौडेल आणि गृहमंत्र्यांच्या खाजगी निवासस्थानांवर हल्ला केला. या हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली असून घरांना आग लावण्यात आली. या प्रकारामुळे शासनयंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
नेपाळमध्ये हे आंदोलन प्रामुख्याने तरुणांच्या नेतृत्वाखाली चालले असून विशेषतः Gen-Z आंदोलनकांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर आहे. सोशल मीडियावर निर्बंध आणल्याने आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कारवाई न झाल्याने संताप वाढला. सुरुवातीला शांततेत सुरु झालेले आंदोलन हळूहळू आक्रमक होत गेले आणि आता थेट हिंसक संघर्षात परिवर्तित झाले आहे.
स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने कडक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. अनेक भागांत कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. तरीदेखील आंदोलनकांचा संताप ओसरत नाही. देशभरातील असंतोष लक्षात घेता पुढील काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
या घटनेमुळे नेपाळच्या राजकारणात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या हिंसाचाराने चिंता व्यक्त केली जात असून नेपाळमधील स्थैर्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter