महाराष्ट्र पोलिस भरती 2025 : वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी
महाराष्ट्र पोलिस भरती 2025 : वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी
महाराष्ट्र शासनाने पोलिस भरती 2025 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी दिली आहे. शिपाय, चालक, बँडस् मॅन, सशस्त्र पोलिस व कारागृह शिपाई पदांसाठी अर्ज करता येणार.
सायली मेमाणे
पुणे १३ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्र पोलिस भरतीसाठी राज्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी आली आहे. राज्य सरकारने महाराष्ट्र पोलिस दलात शिपायांच्या विविध पदांसाठी भरतीस मान्यता दिली आहे. या भरतीत शिपाय, पोलिस शिपाय चालक, बँडस् मॅन, सशस्त्र पोलिस शिपाय आणि कारागृह शिपाय यासारख्या एकूण सुमारे १५ हजार पदांचा समावेश आहे. याबाबत निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्य करण्यात आला असून, शासनाने भरतीसाठी प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.
विशेष बाब म्हणजे, या भरतीमध्ये २०२२ ते २०२५ या कालावधीत वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांनाही संधी दिली जाईल. या निर्णयामुळे वयोमर्यादा संपुष्टात आलेले तरुणही अर्ज करू शकतील आणि भरती प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील. गृह विभागाने १० सप्टेंबर २०२५ रोजी याबाबत शुद्धिपत्रक जारी केले असून, या आदेशानुसार वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना ही विशेष संधी उपलब्ध होणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून पोलिस भरती ठप्प होती, ज्यामुळे विद्यार्थ्यांपासून विविध सामाजिक व युवक संघटनांकडून भरतीसाठी मागणी केली जात होती. सरकारच्या या निर्णयामुळे ही प्रक्रिया पुन्हा सुरू झाली आहे आणि उमेदवारांना न्याय्य संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलिस दलामध्ये योग्य पात्रतेसह इच्छुक उमेदवार अर्ज करून आपली तयारी सिद्ध करू शकतील.
शिपायांसाठी उपलब्ध पदांची माहिती पुढीलप्रमाणे आहे:
- पोलिस शिपाय – १०,९०८ पदे
- पोलिस शिपाय चालक – २३४ पदे
- बँडस् मॅन – २५ पदे
- सशस्त्र पोलिस शिपाय – २,३९३ पदे
- कारागृह शिपाय – ५५४ पदे
या भरतीसाठी उमेदवारांनी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व इतर निकषांची माहिती गृह विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेत सहभाग घेणाऱ्या उमेदवारांना योग्य प्रशिक्षण आणि मार्गदर्शन दिले जाईल.
शासनाचा हा निर्णय केवळ वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसाठीच नाही तर महाराष्ट्रातील भरती प्रक्रियेतील पारदर्शकता आणि युवकांना संधी देण्याच्या दृष्टीकोनातून महत्त्वाचा ठरतो. आगामी काळात भरती प्रक्रियेस सुरळीत पार पडण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.
या भरतीमुळे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील युवकांना पोलीस दलात काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांसह, सर्व पात्र उमेदवारांनी आपली अर्ज प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याची शिफारस करण्यात येते. ही भरती महाराष्ट्रातील युवकांसाठी करिअरची एक मोठी संधी ठरणार आहे.