जळगावात अतिवृष्टीमुळे कापूस, केळी, मोसंबीचे मोठे नुकसान; शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

0
जळगावात अतिवृष्टीमुळे कापूस, केळी, मोसंबीचे मोठे नुकसान; शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

जळगावात अतिवृष्टीमुळे कापूस, केळी, मोसंबीचे मोठे नुकसान; शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा व जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापूस, केळी आणि मोसंबीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. पूराच्या पाण्याने शेतजमीन वाहून गेल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून तातडीने पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे.

सायली मेमाणे

पुणे १७ सप्टेंबर २०२५ : जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पाचोरा आणि जामनेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे कापूस, केळी आणि मोसंबी यांसारख्या प्रमुख पिकांना फटका बसला आहे. पुरामुळे अनेक शेतजमिनी वाहून गेल्या असून शेतकरी हतबल झाले आहेत. पाचोरा तालुक्यातील राजुरी गावातील उतावळी नदीला पूर आल्याने शेतांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे कापूस पिके अक्षरशः वाहून गेली. काही शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या पिकांचा चिखलात चुरा झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे संपूर्ण हंगामाचे श्रम आणि गुंतवणूक पाण्यात गेली आहे.

जामनेर तालुक्यातील नेरी गावालगतची परिस्थिती देखील गंभीर आहे. येथे उभी केळी पिके अतिवृष्टीच्या पाण्यामुळे कोसळून जमीनदोस्त झाली आहेत. शेकडो एकरांवर लावलेली केळी एका रात्रीत नष्ट झाली. मोसंबीच्या बागांवर देखील मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे. झाडांची मुळे पाण्यात बुडाल्यामुळे ती सडू लागली आहेत. त्यामुळे दीर्घकालीन फळउत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे.

या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान कोट्यवधी रुपयांत असल्याचे अंदाज वर्तवले जात आहे. आधीच उत्पादन खर्चात वाढ, खत व बियाण्यांच्या किमतींतील वाढ यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. त्यात आता झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून ही पिके लावली होती. पण आता तेच पिके पूर्णतः नष्ट झाल्याने कर्जफेडीचा प्रश्न गंभीर झाला आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी केली आहे. पिकांचे झालेले नुकसान, शेतजमिनी वाहून जाणे, झाडे उखडणे, याचा व्यवस्थित सर्वे करून तातडीने भरघोस मदत मिळावी अशी अपेक्षा आहे. शासनाने दिलेल्या शेतकरी विमा योजनांचा लाभ सर्व प्रभावित शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा अशी देखील मागणी आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील प्रशासनाला तत्काळ मदत पुरविण्याचे आवाहन केले आहे.

हवामान खात्याने आणखी काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अजून पाऊस वाढल्यास उरलेली पिकेही धोक्यात येऊ शकतात. यामुळे शेतकरी प्रशासनाच्या प्रतिसादाकडे डोळे लावून बसले आहेत.

या संकटात शेतकऱ्यांना तातडीची मदत आणि आर्थिक आधार मिळणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्या कुटुंबाचे भवितव्य संकटात सापडेल. सरकारने त्वरित पावले उचलून शेतकऱ्यांना दिलासा देणे ही काळाची गरज आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed