Pune Accident News: सिम्बायोसिस कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू
सिम्बायोसिस कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांचा भीषण अपघातात मृत्यू
पुण्यातील देहूरोड बायपासवर भीषण अपघात. सिम्बायोसिस कॉलेजचे BBA शिकणारे दोन विद्यार्थी मृत्युमुखी, तर अन्य दोघे गंभीर जखमी. भरधाव स्विफ्ट कार कंटेनरवर आदळल्याने अपघात.
सायली मेमाणे
पुणे १८ सप्टेंबर २०२५ : पुण्यातील मावळ तालुक्यात आज गुरुवारी पहाटे एक भीषण अपघात घडला असून, यात सिम्बायोसिस कॉलेजच्या दोन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. देहूरोड बायपासवरील पुणे-बंगळूर महामार्गावर त्यांच्या स्विफ्ट कारने भरधाव वेगात जात असताना समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. या अपघातात कारचा पुढील भाग अक्षरशः चक्काचूर झाला असून, दृश्य अत्यंत भीषण होते. मृत विद्यार्थ्यांची नावे सिद्धांत आनंद शेखर (वय २० वर्ष) आणि दिव्यराज सिंह प्रेमसिंग राठोड (वय २० वर्ष) अशी आहेत. या दोघांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात हर्ष मिश्रा (वय २१ वर्ष) आणि निहार तांबोळी (वय २० वर्षे) हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाकड येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. ही घटना आज पहाटे पावणे सहा वाजण्याच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांनी सांगितले. प्राथमिक माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गाडीचा वेग जास्त होता. चालकाला डुलकी लागली की अन्य काही कारणाने गाडीवरील ताबा सुटला हे तपासात स्पष्ट होणार आहे.
चारही विद्यार्थी सिम्बायोसिस कॉलेजच्या BBA अभ्यासक्रमाचे होते. ते काल रात्री लोणावळा येथे फिरायला गेले होते. परत येताना त्यांच्या स्विफ्ट डिझायर कारने कंटेनरला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. धडकेनंतर कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला होता. पोलिसांनी सांगितले की, हा अपघात इतका भीषण होता की मृत्यू झालेल्या दोघांना वाचवण्याची शक्यता नव्हती.
घटनास्थळी तातडीने पोलिसांनी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आले आहेत. या अपघातात सहभागी असलेल्या आयशर कंटेनरचा चालक मनीष कुमार सुरज मणिपाल (वय ३९, रा. वडाळा) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.
या अपघातामुळे पुण्यातील विद्यार्थी वर्तुळात आणि सिम्बायोसिस कॅम्पसमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. कमी वयात दोन विद्यार्थ्यांचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रस्ते अपघाताचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याने पुन्हा एकदा वाहतूक सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. भरधाव गाड्या, झोपेच्या अवस्थेत वाहन चालवणे आणि वेगमर्यादा न पाळणे यामुळे अशा घटना घडत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.
हा अपघात पोलिसांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी धोक्याची घंटा ठरला आहे. प्रवास करताना सुरक्षितता, गाडीचा वेग नियंत्रित ठेवणे आणि वाहन चालवताना पूर्ण एकाग्रता ठेवणे किती महत्त्वाचे आहे हे या घटनेतून स्पष्ट झाले आहे. मृत विद्यार्थ्यांचे शवविच्छेदनानंतर त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत असून, कंटेनर चालकाच्या निष्काळजीपणाबाबतही तपास सुरू आहे.