नवरात्रोत्सवात गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नको, विहिंपची सूचना वादात

0
नवरात्रोत्सवात गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नको, विहिंपची सूचना वादात

नवरात्रोत्सवात गरब्यात मुस्लिमांना प्रवेश नको, विहिंपची सूचना वादात

नागपूरमध्ये नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेने गरबा आयोजनकांना मुस्लिम तरुणांना प्रवेश नाकारण्याच्या सूचना दिल्या आहेत. आधार कार्ड तपासूनच प्रवेश द्यावा, अन्यथा पोलिसांकडे सोपवावे असे आवाहन.

सायली मेमाणे

पुणे २० सप्टेंबर २०२५ :नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी राज्यभर सुरू असून, विविध मंडळे व आयोजन समित्या आकर्षक पांडाल, देवीचे अलंकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आखणी करत आहेत. याच दरम्यान नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषदेच्या सूचनेमुळे नवा वाद पेटला आहे. विहिंपने नवरात्रोत्सवातील गरब्याच्या कार्यक्रमांना फक्त हिंदूंसाठीच प्रवेश द्यावा, मुस्लिम तरुणांना यात सहभागी होऊ देऊ नये, अशा सूचना आयोजकांना दिल्या आहेत. या सूचनेमुळे सामाजिक आणि राजकीय वर्तुळात संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील विविध गरबा आयोजकांना पत्र देऊन विहिंपने स्पष्ट केले आहे की गरब्यात प्रवेश करण्यापूर्वी प्रत्येकाचा आधार कार्ड तपासला जावा. जर मुस्लिम तरुण गरब्यात आढळून आले तर त्यांना पोलिसांच्या ताब्यात द्यावे. विहिंपचे म्हणणे आहे की, नवरात्रोत्सव हा हिंदूंचा धार्मिक सण असून यात इतर धर्मीयांनी प्रवेश करू नये.

या सूचनेमुळे शहरात वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक सामाजिक संघटनांनी या निर्णयाला आक्षेप घेतला असून धार्मिक सौहार्द धोक्यात येईल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तर काही राजकीय नेत्यांनी याला धार्मिक दंगलीचे बीज पेरण्याचा प्रयत्न म्हटले आहे. नागपूरसह महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये नवरात्रोत्सवात नेहमीच सर्वधर्मीय लोक सहभागी होत असतात. त्यामुळे या प्रकारच्या सूचनांना वाव देणे म्हणजे समाजात अनावश्यक फूट पाडण्याचा प्रयत्न असल्याचे टीकाकारांचे मत आहे.

दरम्यान, पोलीस प्रशासनाने आयोजकांना सावधगिरी बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या धर्मावरून गरब्यात सहभागी होण्यास अडवणे हा कायद्याचा भंग ठरू शकतो, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. कायद्याचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

नवरात्रोत्सव हा धार्मिक तसेच सांस्कृतिक एकात्मतेचा सण मानला जातो. दांडिया आणि गरब्याच्या माध्यमातून लोक एकत्र येतात आणि आनंदोत्सव साजरा करतात. परंतु अशा प्रकारच्या वादग्रस्त सूचनांमुळे नवरात्रोत्सवाच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांच्या मते, धार्मिक स्थळे किंवा उत्सवात प्रवेश देताना धर्माच्या आधारे भेदभाव करणे हे भारतीय संविधानाच्या तत्त्वांना धरून नाही. नागपूरमध्ये उभ्या राहिलेल्या या वादामुळे नवरात्रोत्सवातील आयोजन अधिकच संवेदनशील होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि आयोजकांनी संयमाने व कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed