Navi Mumbai APMC: शेतकऱ्यांची लूट, फळांच्या दरकपातीचा धक्कादायक प्रकार
शेतकऱ्यांची लूट, फळांच्या दरकपातीचा धक्कादायक प्रकार
नवी मुंबई APMC फळ मार्केटमध्ये शेतकऱ्यांना आपला माल विकताना धक्कादायक तोटा; व्यापारी संगनमताने दर ठरवून शेतकऱ्यांचे 60-70% नफा झटकत आहेत.
सायली मेमाणे
पुणे २४ सप्टेंबर २०२५ : नवी मुंबई APMC फळ मार्केटमध्ये शेतकऱ्यांसाठी धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. शेतकरी बांधव आपला कष्टाने पिकवलेला माल घेऊन मोठ्या आशेने बाजारात येतात की योग्य दर मिळेल आणि घामाचा पैसा वाया जाणार नाही. मात्र प्रत्यक्षात येथे शेतकऱ्यांची अक्षरशः लूट होत असल्याचे उघड झाले आहे.
वाशी एपीएमसी मार्केटमध्ये नियमनमुक्त भाजीपाला आणि फळांचा व्यापार होत असतानाही पारदर्शक लिलाव प्रणाली राबवली जात नाही. व्यापारी गुप्तपणे व्यवहार करतात. संपूर्ण विक्री “टॉवेल” किंवा “गमजा” पद्धतीने म्हणजे फडक्यात हात घालून केली जाते, ज्यामुळे शेतकरी स्वतः उपस्थित असला तरी त्याला आपल्या मालाचा नेमका दर कळत नाही.
उदाहरणादाखल, ड्रॅगन फळ 150 ते 160 रुपये किलो दराने विकले गेले, तरी व्यापारी शेतकऱ्याला फक्त 80 ते 90 रुपये किलो दर दाखवतात. उर्वरित नफा व्यापाऱ्यांच्या खिशात जातो. शेतकऱ्यांनी आरोप केला आहे की, संगनमतामुळे त्यांना 60 ते 70 टक्क्यांपर्यंत तोटा सहन करावा लागतो.
शेतकरी विचारणा करत असताना व्यापाऱ्यांकडून “पावसामुळे दर पडलेत”, “आवक वाढली आहे”, “फळांची साईज वेगळी आहे” अशा कारणांची बडबड केली जाते. जर एखादा व्यापारी जरा जास्त दर देण्याचा प्रयत्न करतो, तर इतर व्यापारी मिळून त्याच्यावर दबाव टाकतात आणि पुढे त्याला कमी दर देण्यास भाग पाडतात. तसेच, जर शेतकऱ्याने आवाज उठवला, तर व्यापारी वाहतूकदारांना सूचित करून त्यांचा माल उतरवून घेत नाहीत, ज्यामुळे दुहेरी तोटा होतो.
या संपूर्ण प्रकारामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे तातडीने मागणी केली आहे की, वाशी APMCमध्ये पारदर्शक निलाव प्रणाली लागू करावी. अन्यथा शेतकऱ्यांचा विश्वास संपुष्टात येईल आणि थेट संघर्ष उभा राहील.
शेतकरी वर्ग आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्य सरकारच्या पुढाकाराकडे बघत आहेत. बाजारपेठेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि फळांच्या योग्य दर सुनिश्चित करण्यासाठी काय कार्यवाही होते, हे पुढील काळात ठरवले जाईल. पारदर्शक व्यवहार आणि शेतकऱ्यांचे संरक्षण याशिवाय बाजारपेठेत विश्वास टिकवणे अशक्य ठरेल.
या प्रकरणामुळे मराठी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढली असून, सरकारकडे तातडीच्या उपाययोजनांची अपेक्षा आहे. वाशी APMC सारख्या बाजारपेठांमध्ये शेतकरी आणि व्यापाऱ्यांमधील व्यवहार पारदर्शक करण्यासाठी योग्य धोरणे राबविणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ शकतात.