Catch-Up Vaccination: मुलांच्या चुकलेल्या लसीकरणासाठी डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला

Catch-Up Vaccination: मुलांच्या चुकलेल्या लसीकरणासाठी डॉक्टरांचा महत्त्वाचा सल्ला
पालकांसाठी मार्गदर्शन: मुलांचे लसीकरण चुकल्यास काय करावे? कॅच-अप लसीकरणाद्वारे मुलांना आवश्यक संरक्षण मिळवून गंभीर आजारांपासून बचाव करता येतो, डॉ. अमर भिसे यांचे मार्गदर्शन.
सायली मेमाणे
पुणे २४ सप्टेंबर २०२५ : पालकांसाठी एक मोठा प्रश्न आहे – मुलांचे लसीकरण वेळेवर पूर्ण करता येतेय का? अनेक कारणांमुळे लसीकरण चुकले असले तरी काळजी करण्याची गरज नाही. कॅच-अप लसीकरणामुळे चुकलेल्या लसींना पूर्ण करून मुलांना आवश्यक ते संरक्षण देता येते. यामुळे मुलांचे आरोग्य सुरक्षित राहते आणि संसर्गजन्य आजारांचा प्रसार रोखता येतो. डॉ. अमर भिसे, सल्लागार – पीआयसीयू, नवजात शिशु व बालरोगतज्ज्ञ, मदरहूड हॉस्पिटल्स, पुणे यांनी कॅच-अप लसीकरणाचे महत्त्व स्पष्ट केले आहे.
तज्ज्ञांच्या मते, मुलांच्या आरोग्यासाठी कॅच-अप लसीकरण आवश्यक आहे. पालकांनी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधून कोणती लस चुकली आहे आणि ती कधी घ्यावी हे निश्चित करावे. लसीकरण मुलांना गंभीर आजारांपासून वाचविण्याचे सर्वात प्रभावी उपाय आहे. आजारपण, प्रवास किंवा जागरूकतेचा अभाव अशा कारणांमुळे बऱ्याच मुलांचे लसीकरण वेळेत होत नाही. अशा परिस्थितीत कॅच-अप लसीकरणाने ही उणीव भरून काढली जाऊ शकते.
नवजात बाळापासून ते दोन वर्षांपर्यंतच्या मुलांसाठी कॅच-अप लसीकरणातील महत्वाच्या लसींमध्ये डीटीएपी (डिप्थेरिया, टिटॅनस, पर्टसिस), हिब (हॅमॉफिलस इन्फ्लूएंझा टाईप बी), पोलिओ, हिपॅटायटीस बी, रोटाव्हायरस, पीसीव्ही१३ (न्यूमोकोकल कॉन्जुगेट लस) यांचा समावेश आहे. या वयोगटातील बाळ अतिशय संवेदनशील असते, त्यामुळे लस चुकल्यास विलंब न करता ती पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.
३ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कॅच-अप लसीकरणात एमएमआर (गोवर, गलगंड, रुबेला) – दोन डोस, व्हॅरिसेला (चिकनपॉक्स) – दुसरा डोस, टीडीएपी (टिटॅनस, डिप्थेरिया, पर्टसिस) – ११-१२ वयात बूस्टर डोस, एचपीव्ही (ह्युमन पॅपिलोमा व्हायरस) – ११-१२ वयात पहिला डोस, मेनिंगोकॉकल लस यांचा समावेश आहे. या लसीकरणामुळे शाळा आणि सामाजिक ठिकाणी संसर्गजन्य आजारांचा प्रसार कमी होतो.
कॅच-अप लसीकरण हे बालआरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचे पाऊल आहे. प्रत्येक वयोगटातील मुलांचे लसीकरण पूर्ण करणे गरजेचे आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, गंभीर आजार टळतात आणि रोगांचा प्रसार थांबतो.
डॉ. भिसे यांनी पालकांना सांगितले की, मुलांचे लसीकरण पूर्ण करताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लसीकरणाची माहिती नियमित तपासणे, वयोगटानुसार सर्व आवश्यक लसी वेळेवर घेणे आणि चुकलेल्या लसी त्वरित पूर्ण करणे मुलांच्या दीर्घकालीन आरोग्यासाठी महत्वाचे आहे.
कॅच-अप लसीकरणामुळे केवळ मुलांचे आरोग्य सुरक्षित राहत नाही तर समुदायात रोगांचा प्रसारही प्रतिबंधित होतो. पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण वेळेवर पूर्ण करून त्यांच्या आरोग्याचे आणि भविष्यातील सुरक्षिततेचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter