झेडपी आणि मनपाच्या निवडणुका दिवाळीत दोन टप्प्यांत होण्याची शक्यता
झेडपी आणि मनपाच्या निवडणुका महाराष्ट्रात दिवाळीत
महाराष्ट्रात झेडपी व मनपा निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून दिवाळीत मतदानाचे संकेत मिळत आहेत. १ लाख ईव्हीएम यंत्रांची गरज; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हालचालींना वेग.
सायली मेमाणे,
पुणे : ३१ मे २०२५ : राज्यातील जिल्हा परिषद (झेडपी) आणि महापालिका (मनपा) निवडणुका अखेर यंदा दिवाळीच्या काळात पार पडण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडामोडींनुसार या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून, राज्य निवडणूक आयोगाकडून आवश्यक ती तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे या निवडणुकांसाठी सुमारे एक लाख ईव्हीएम यंत्रांची गरज भासणार आहे.
राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सध्या प्रशासक कार्यरत असून, अनेक ठिकाणी गेल्या तीन ते पाच वर्षांपासून लोकप्रतिनिधींची निवड झाली नाही. या निवडणुकांची प्रक्रिया २०१७ साली निश्चित झालेल्या प्रभाग रचनेच्या आधारावर राबवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार, प्रलंबित स्थानिक निवडणुका चार महिन्यांच्या आत घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीच्या प्रक्रियेला वेग दिला आहे. या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मतदानाची शक्यता आहे.
ईव्हीएम संदर्भात बोलायचं झाल्यास, सध्या आयोगाकडे सुमारे ६४ हजार मशीन उपलब्ध आहेत. मात्र ही संख्या अपुरी ठरण्याची शक्यता असल्यामुळे उर्वरित ईव्हीएमसाठी केंद्र सरकारकडे मागणी केली जाणार आहे. यासाठी सध्या आयोग आवश्यक तांत्रिक बदलांची चाचपणी करत आहे.
झेडपी निवडणुका पहिल्या टप्प्यात आणि महापालिका निवडणुका दुसऱ्या टप्प्यात घेण्याचा विचार आहे. ही विभागणी ईव्हीएमची उपलब्धता आणि निवडणूक यंत्रणांच्या क्षमतेच्या आधारे करण्यात येणार आहे.
२०१७ साली प्रभाग रचना केल्यानंतर त्या रचनेचा लाभ काही विशिष्ट राजकीय गटांना झाला होता. आता पुन्हा त्याच रचनेनुसार निवडणुका झाल्यास त्याचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे.
ही निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पुन्हा लोकप्रतिनिधी सत्तेवर येतील आणि विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
1 thought on “झेडपी आणि मनपाच्या निवडणुका दिवाळीत दोन टप्प्यांत होण्याची शक्यता”