सिद्धांत शिरसाट वाद: शारीरिक छळ, जबरदस्तीने गर्भपात आणि धमकीचे आरोप; संजय शिरसाट यांचे पुत्र अडचणीत

0
सिद्धांत शिरसाट वाद: शारीरिक छळ, जबरदस्तीने गर्भपात आणि धमकीचे आरोप; संजय शिरसाट यांचे पुत्र अडचणीत

सिद्धांत शिरसाट वाद: शारीरिक छळ, जबरदस्तीने गर्भपात आणि धमकीचे आरोप; संजय शिरसाट यांचे पुत्र अडचणीत

मुंबई – मुळशीतील वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर मुंबईतून आणखी एक चिंताजनक घटना उघड झाली आहे. शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा मुलगा सिद्धांत शिरसाट याच्यावर एका विवाहित महिलेने गंभीर आरोप केले आहेत. जान्हवी सिद्धांत शिरसाट नावाच्या महिलेने सिद्धांत यांच्याविरोधात कायदेशीर नोटीस पाठवून मानसिक आणि शारीरिक त्रास, फसवणूक, धमकी व हुंडा प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे

महिलेच्या म्हणण्यानुसार, २०१८ साली सोशल मीडियावरून तिची आणि सिद्धांत यांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी चेंबूरमधील एका फ्लॅटमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित केले. सिद्धांत यांनी आत्महत्येची धमकी देऊन भावनिकदृष्ट्या दबाव टाकत लग्नासाठी भाग पाडले. अखेर १४ जानेवारी २०२२ रोजी बौद्ध पद्धतीने विवाह केल्याचा दावा महिलेने केला असून, त्याचे पुरावेही तिच्याकडे असल्याचे ती म्हणते. या काळात ती गर्भवती झाली होती, परंतु सिद्धांत यांनी जबरदस्तीने गर्भपात करवून घेतल्याचा आरोपही तिने केला आहे.

लग्नानंतर सिद्धांतच्या वागणुकीत परिवर्तन झाले. त्यांनी महिलेला चेंबूरमधील फ्लॅटमध्ये राहण्यास सांगितले आणि छत्रपती संभाजीनगरला जाण्यास नकार दिला. याच दरम्यान, सिद्धांतचे इतर महिलांसोबतचे संबंध उघड झाल्यानंतर त्यांनी पीडितेला धमकावण्यास प्रारंभ केला. “जर तू पोलिसांकडे गेलीस, तर मी आत्महत्या करीन आणि तुझ्या कुटुंबाचे नुकसान करीन,” अशी धमकी महिलेने दिली आहे.

या प्रकारानंतर, २० डिसेंबर २०२४ रोजी तिने शाहूनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र सिद्धांत हे मंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र असल्याने पोलिसांनी कारवाई करण्यास टाळाटाळ केली, असा आरोप महिलेने कायदेशीर नोटीसमध्ये केला आहे. तिचे वकील ॲड. चंद्रकांत ठोंबरे यांनी सिद्धांत शिरसाट यांनी महिलेला नांदवून न्याय द्यावा, अन्यथा त्यांच्यावर महिला अत्याचार प्रतिबंधक कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा आणि फसवणूक अशा कलमांखाली गुन्हा दाखल केला जाईल, अशी चेतावणी दिली आहे.

तसेच, सिद्धांत यांनी तिला फोन करून “फोन करू नकोस, नाहीतर तुझे कुटुंब गुंडाकडून संपवीन” अशी धमकी दिल्याचा गंभीर आरोपही महिलेने केला आहे. “माझे वडील मंत्री आहेत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत,” असे सांगून त्यांनी राजकीय प्रभाव दाखवण्याचा प्रयत्न केल्याचेही महिलेने नमूद केले आहे.

या प्रकरणाची दखल घेत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी त्वरित आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. “जर मंत्रिपदाचा वापर करून पीडितेला न्याय मिळू दिला जात नसेल, तर याविरोधात कडक भूमिका घेणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed