श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत

श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासकडून पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत
महाराष्ट्रातील पूरस्थिती पाहता श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 10 कोटींची मदत जाहीर केली. कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी केली घोषणा.
सायली मेमाणे
पुणे २९ सप्टेंबर २०२५ : राज्यात मुसळधार पावसामुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांना पूर आला असून हजारो कुटुंबे विस्थापित झाली आहेत. शेतीचे मोठे नुकसान झाले असून ग्रामीण भागात रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे, तरीही अनेक भागांमध्ये मदतीचे आव्हान कायम आहे. या पार्श्वभूमीवर शासन, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संघटनांकडून मदतीचा ओघ सुरू आहे.
याच दरम्यान श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासकडून एक मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. मंदिर न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी तब्बल दहा कोटी रुपयांची मदत दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी सांगितले की, पूरग्रस्तांच्या अडचणी दूर करण्यासाठी आणि त्यांना तातडीची मदत पोहोचवण्यासाठी मंदिर न्यास हा निधी उपलब्ध करून देत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीद्वारे पीडितांना अन्न, पाणी, औषधे, निवारा आणि आवश्यक वस्तू पुरवण्यात येणार आहेत.
राज्यातील पूरस्थितीमुळे अनेक गावांमध्ये घरांची व शेतीची हानी झाली असून नागरिकांना जगण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. प्रशासनाने विविध ठिकाणी बचाव कार्य सुरू केले असून एनडीआरएफ, पोलीस व स्थानिक कर्मचारी तातडीने मदत पुरवण्याचे प्रयत्न करत आहेत. पूरामुळे शाळांनाही सुट्ट्या जाहीर कराव्या लागल्या आहेत.
श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाने यापूर्वीही अनेक नैसर्गिक आपत्तींच्या काळात, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान दिले आहे. यंदाच्या पुरस्थितीत पुन्हा एकदा पुढाकार घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधीत दहा कोटी रुपयांची मदत केल्याने पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. या निर्णयामुळे धार्मिक संस्थांच्या सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण साकार झाले आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी उद्योगपती, सामाजिक संस्था तसेच सामान्य नागरिकदेखील पुढे येत आहेत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मिळणारी मदत नागरिकांच्या पुनर्वसनासाठी आणि गरजूंना तातडीने मदत करण्यासाठी उपयोगी ठरणार आहे. शासनानेही सर्व नागरिकांना पूरग्रस्तांना शक्य ती मदत करण्याचे आवाहन केले आहे.
Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter