Ajit Pawar Death: ‘सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा’ राष्ट्रवादीत नेतृत्वावरून हालचालींना वेग
Ajit Pawar Death: ‘सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा’ राष्ट्रवादीत नेतृत्वावरून हालचालींना वेग
Ajit Pawar यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी, पार्थ-जय पवारांच्या भूमिकेवरही चर्चा.
पुणे २८ जानेवारी २०२६ : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकस्मित निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. बारामतीत शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले असून, या वेळी राज्यातील सर्व प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र अंत्यसंस्कारानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसच्या भवितव्याबाबत चर्चांना वेग आला आहे. अजित पवारांच्या निधनानंतर पक्षाचं नेतृत्व कोण करणार, राष्ट्रवादीतील दोन्ही गट एकत्र येणार का, की पुन्हा अंतर्गत संघर्ष उफाळून येणार, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
या चर्चांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांनी एक मोठी आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मागणी पुढे आणली आहे. सुनेत्रा पवार यांनाच उपमुख्यमंत्री करावे, अशी स्पष्ट मागणी झिरवाळ यांनी केली आहे. त्यांच्या मते, ही केवळ पक्षाची नाही तर जनतेचीही प्रामाणिक इच्छा आहे. अजित पवार यांच्या जाण्यानंतर पवार कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे नेण्यासाठी सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदी, विशेषतः उपमुख्यमंत्रीपदी आणणे हीच दादांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सुनेत्रा पवार सध्या राज्यसभा खासदार आहेत. त्यामुळे त्या पुन्हा राज्याच्या सक्रिय राजकारणात उतरणार का, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसमधील सर्वमान्य, ताकदवान आणि निर्णयक्षम नेतृत्व होते. त्यांच्या अनुपस्थितीत पक्षाला तितक्याच वजनाचा नेता सध्या तरी दिसत नाही, ही वस्तुस्थिती पक्षातील अनेक नेते खासगीत मान्य करत आहेत. त्यामुळे नेतृत्वासाठी स्पर्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
याच पार्श्वभूमीवर अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि जय पवार यांच्याकडे पक्षाची धुरा दिली जाणार का, हा प्रश्नही उपस्थित झाला आहे. पार्थ पवार यांचा आधीच राजकीय अनुभव असून ते लोकसभा निवडणुकीत उतरले होते, तर जय पवार तुलनेने राजकारणात कमी सक्रिय आहेत. मात्र पवार कुटुंबातील पुढील पिढीला पक्षाची जबाबदारी देण्यात येईल का, यावर अद्याप कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाही.
अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्तित्वाचा प्रश्नही अनेकांना सतावत आहे. पक्षाला एकत्र ठेवण्यासाठी अनुभव, जनाधार आणि संघटनात्मक ताकद असलेले नेतृत्व आवश्यक आहे. अशा परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्व देण्याची मागणी प्रथमच उघडपणे समोर आली असून, या मागणीला पक्षातील किती नेत्यांचा पाठिंबा मिळतो, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांसारख्या वरिष्ठ नेत्यांची भूमिका काय असणार, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. हे नेते कोणाच्या पाठीशी उभे राहतात, यावर राष्ट्रवादी काँग्रेसची पुढील दिशा आणि सत्ता समीकरणे ठरण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कोण भरून काढणार, हा प्रश्न आता महाराष्ट्राच्या राजकारणात केंद्रस्थानी आला आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information