Asian Games 2026: भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे वेळापत्रक जाहीर जाणून घ्या सामने कधी?

0
Asian Games 2026: भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे वेळापत्रक जाहीर जाणून घ्या सामने कधी?

Asian Games 2026: भारताच्या पुरुष आणि महिला क्रिकेट संघांचे वेळापत्रक जाहीर जाणून घ्या सामने कधी?

Asian Games 2026 मधील टी-२० क्रिकेटचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारतीय महिला संघ १७ सप्टेंबरला जपानविरुद्ध, तर पुरुष संघ २८ सप्टेंबरला मैदानात उतरणार आहे.

पुणे 26 ऑगस्ट 2026 : जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील टी-२० क्रिकेटचे वेळापत्रक समोर आले असून भारतीय पुरुष आणि महिला संघांच्या सामन्यांकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. २०२६ मधील आशियाई क्रीडा स्पर्धा १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत आयची-नागोया येथे होणार आहे. क्रिकेटचे सामने मुख्य स्पर्धेच्या उद्घाटनापूर्वीच सुरू होतील. महिला क्रिकेट स्पर्धा १७ सप्टेंबरपासून, तर पुरुषांची स्पर्धा २४ सप्टेंबरपासून खेळवली जाईल. दोन्ही गटांतील सामने टी-२० स्वरूपात होतील. ऑलिम्पिक कौन्सिल ऑफ एशियाने क्रिकेटच्या समावेशाला अधिकृत मंजुरी दिली आहे.

भारतीय महिला संघ गतविजेता म्हणून स्पर्धेत प्रवेश करणार असून त्याचा पहिला सामना १७ सप्टेंबर रोजी यजमान जपानविरुद्ध होईल. हा उपांत्यपूर्व फेरीचा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार पहाटे ५.३० वाजता खेळवला जाणार आहे. त्याच दिवशी सकाळी १०.३० वाजता बांगलादेश आणि चीन यांच्यात सामना होईल. उर्वरित दोन उपांत्यपूर्व सामने १८ सप्टेंबरला होतील. श्रीलंका-मलेशिया सामना पहाटे ५.३० वाजता, तर पाकिस्तान-थायलंड सामना सकाळी १०.३० वाजता सुरू होईल.

उपांत्यपूर्व सामना जिंकल्यास भारतीय महिला संघ २० सप्टेंबर रोजी उपांत्य फेरीत खेळेल. या दिवशी दोन उपांत्य सामने अनुक्रमे पहाटे ५.३० आणि सकाळी १०.३० वाजता होतील. महिला गटातील कांस्यपदकाचा सामना २२ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता, तर सुवर्णपदकासाठीची अंतिम लढत सकाळी १०.३० वाजता खेळवली जाईल. महिला स्पर्धेत एकूण आठ संघ सहभागी असून स्पर्धेला थेट बाद फेरीपासून सुरुवात होणार आहे.

पुरुषांच्या स्पर्धेत एकूण दहा संघ सहभागी होणार आहेत. भारतासह पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चार मानांकित संघांना थेट उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश देण्यात आला आहे. अफगाणिस्तान, जपान आणि नेपाळ यांचा ‘अ’ गटात, तर हाँगकाँग, मलेशिया आणि ओमान यांचा ‘ब’ गटात समावेश करण्यात आला आहे. या सहा संघांमधील प्राथमिक फेरी २४ ते २६ सप्टेंबरदरम्यान होईल. दोन्ही गटांतील प्रत्येकी दोन अव्वल संघ उपांत्यपूर्व फेरीत दाखल होतील.

भारतीय पुरुष संघ २८ सप्टेंबर रोजी पहाटे ५.३० वाजता ‘ब’ गटातील उपविजेत्या संघाविरुद्ध उपांत्यपूर्व सामना खेळेल. त्याच दिवशी सकाळी १०.३० वाजता पाकिस्तानचा सामना ‘अ’ गटातील उपविजेत्याशी होईल. २९ सप्टेंबरला श्रीलंका ‘ब’ गटातील विजेत्याविरुद्ध, तर बांगलादेश ‘अ’ गटातील विजेत्याविरुद्ध मैदानात उतरेल.

पुरुष गटातील दोन्ही उपांत्य सामने १ ऑक्टोबर रोजी होतील. कांस्यपदकाची लढत ३ ऑक्टोबरला पहाटे ५.३० वाजता, तर सुवर्णपदकाचा सामना सकाळी १०.३० वाजता खेळवला जाईल. भारत आणि पाकिस्तानला वेगवेगळ्या बाजूंच्या ड्रॉमध्ये स्थान मिळाल्यामुळे दोन्ही संघ सर्व सामने जिंकल्यास त्यांची गाठ थेट अंतिम फेरीत पडू शकते. सर्व सामने आयची प्रांतातील कोरोगी ॲथलेटिक पार्क येथे आयोजित करण्यात आले आहेत. हांगझोऊ येथे झालेल्या मागील आशियाई स्पर्धेत भारताने पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटांत सुवर्णपदक पटकावले होते. त्यामुळे जपानमध्ये दोन्ही भारतीय संघांसमोर विजेतेपद कायम राखण्याचे मोठे आव्हान असेल.

Also Read: Pune’s Latest Information
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *