ATM-Debit Card नियम बदल: 1 जुलैपासून ICICI व HDFC बँक ग्राहकांसाठी मोठे अपडेट

1
क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांच्या नियमांमध्ये मोठे बदल करत आहेत

क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांच्या नियमांमध्ये मोठे बदल करत आहेत

1 जुलैपासून ICICI आणि HDFC बँका ATM, क्रेडिट आणि डेबिट कार्ड व्यवहारांच्या नियमांमध्ये मोठे बदल करत आहेत; जाणून घ्या नवीन शुल्क आणि मर्यादा.

सायली मेमाणे

१९ जून २०२५ : 1 जुलै 2025 पासून खाजगी क्षेत्रातील दोन प्रमुख बँका — ICICI आणि HDFC — त्यांच्या ATM, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड सेवांमध्ये महत्त्वाचे बदल करणार आहेत. यामुळे कोट्यवधी ग्राहकांच्या खिशाला कात्री लागू शकते. ICICI बँकेने एटीएम व्यवहार, कॅश विड्रॉल, डिमांड ड्राफ्ट आणि डेबिट कार्ड सेवांवरील शुल्क वाढवले आहे, तर HDFC बँकेने गेमिंग अ‍ॅप्स, वॉलेट टॉपअप आणि भाडे भरण्याशी संबंधित व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क लावण्याचा निर्णय घेतला आहे.

ICICI बँकेचे ग्राहक दुसऱ्या बँकेच्या ATMचा वापर केल्यास आता फक्त 3 मोफत व्यवहार करता येतील, त्यानंतर आर्थिक व्यवहारासाठी 23 रुपये आणि गैरआर्थिक व्यवहारासाठी 8.5 रुपये शुल्क आकारले जाईल. यापूर्वी हे शुल्क अनुक्रमे 21 रुपये होते. लहान शहरांमध्ये मात्र 5 मोफत व्यवहाराची सवलत असेल. यासोबतच IMPS व्यवहारांवरही रकमेच्या आधारावर शुल्क लागू करण्यात आले आहे — 1,000 रुपयांपर्यंत 2.50 रुपये, 1 लाखापर्यंत 5 रुपये, आणि 5 लाखांपर्यंत 15 रुपये.

दरमहा फक्त तीन वेळा मोफत पैसे काढण्याची सुविधा असेल आणि त्यानंतर प्रत्येक कॅश विड्रॉवर 150 रुपये शुल्क आकारले जाईल. तसेच जर एकूण रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा अधिक असेल तर प्रत्येक 1,000 रुपयांवर 3.5 रुपये किंवा 150 रुपये, यापैकी जे अधिक असेल ते शुल्क लागू होईल. डेबिट कार्डसाठी वार्षिक शुल्क 300 रुपये आहे, ग्रामीण भागासाठी हेच शुल्क 150 रुपये राहील. कार्ड हरवले किंवा खराब झाल्यास नवीन कार्डासाठीही 300 रुपये शुल्क आकारले जाईल.

डिमांड ड्राफ्ट किंवा पे ऑर्डरसाठी प्रत्येक 1,000 रुपयांवर 2 रुपये शुल्क आकारले जाईल. यामध्ये प्रति व्यवहार किमान 50 रुपये आणि कमाल 15,000 रुपये इतकी मर्यादा असणार आहे.

HDFC बँकेच्या नियमांमध्ये आणखी बदल होत आहेत. जर ग्राहकांनी Dream11 किंवा MPL सारख्या गेमिंग अ‍ॅप्सवर महिन्याला 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम खर्च केली, तर त्यांना 1% अतिरिक्त शुल्क भरावे लागेल. या शुल्काची कमाल मर्यादा 4,999 रुपये ठेवण्यात आली आहे आणि या व्यवहारांवर कोणतेही रिवॉर्ड पॉइंट्स दिले जाणार नाहीत. याशिवाय, पेटीएम, मोबिक्विक, फ्रीचार्ज, ओला मनी यांसारख्या डिजिटल वॉलेटमध्ये महिन्याला 10,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम टाकल्यासही 1% शुल्क लागेल.

क्रेडिट कार्डद्वारे घरभाडे भरल्यास, प्रत्येक व्यवहारावर 1% शुल्क आकारले जाईल आणि ते महिन्याला 4,999 रुपयांपर्यंत मर्यादित असेल. याशिवाय, जर इंधनासाठी 15,000 रुपयांपेक्षा जास्त किंवा युटिलिटी बिलासाठी 50,000 रुपयांपेक्षा जास्त व्यवहार केला, तर त्यावरही 1% शुल्क लावले जाईल.

ICICI आणि HDFC बँक ग्राहकांनी या बदलांबाबत सजग राहणे आवश्यक आहे, कारण हे शुल्क एकूण आर्थिक नियोजनावर परिणाम करू शकते. वेळेत बँकेच्या अटी समजून घेऊन योग्य पर्याय निवडणे ही आता गरज बनली आहे.

Do-follow Links:
Instagram: https://www.instagram.com/newsdotz/
YouTube: https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=61573903448264
Twitter: https://x.com/NewsDotz

1 thought on “ATM-Debit Card नियम बदल: 1 जुलैपासून ICICI व HDFC बँक ग्राहकांसाठी मोठे अपडेट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *