रितेश अढाऊ यांच्या ‘बाप – हाच माझा गुन्हा’ लघुपटास जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक
रितेश अढाऊ यांच्या 'बाप - हाच माझा गुन्हा' लघुपटास जिल्हास्तरीय प्रथम पारितोषिक
पुण्यातील पंडित जवाहर नेहरू संस्कृती भवन येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग अंतर्गत स्त्री सक्षमीकरण या विषयावर लघुपट, रिल्स, डाक्युमेंटरी यांच्या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेत दिग्दर्शक तथा लेखक रितेश अढाऊ यांनी काढलेल्या ‘बाप हाच माझा गुन्हा’ या लघुपटास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे दिल्या गेले.
सायली मेमाणे
पुणे १५ सप्टेंबर २०२५ : पुणे येथे घेण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभाग अंतर्गत स्त्री सक्षमीकरण या विषयावर लघुपट, रिल्स, डाक्युमेंटरी यांच्या भव्य राज्यस्तरीय स्पर्धेत दिग्दर्शक तथा लेखक रितेश अढाऊ यांनी काढलेल्या ‘बाप हाच माझा गुन्हा’ या लघुपटास प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले.
जेष्ठ सिने अभिनेते अरुण नलावडे, प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, प्रभाकर मोरे, देविका दफ्तरदार, असित रेडीज, सुनिल गोडबोले, प्रभाकर मोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

आज आपण विज्ञानयुगात जगत आहोत. विचार बदलले आहेत, पण ग्रामीण पातळीवर अजूनही प्रेमविवाहाला वेगळ्या नजरेने पाहिले जाते. मुलगा असो किंवा मुलगी, आपल्या मनातील भावना कुटुंबासमोर मोकळेपणाने बोलण्याचे धैर्य नसते, आणि याच कारणामुळे घराघरांत ताणतणाव आणि दुःख निर्माण होते.
बाप – हाच माझा गुन्हा ही शॉर्टफिल्म सांगते की प्रेम ही चूक नाही, पण पळून जाणे ही नक्कीच चूक आहे.
कुटुंबाने दिलेलं प्रेम, त्याग, जपणूक याचा अपमान करून नातेसंबंध तोडू नका. पालकांना तुमच्याविषयी अभिमान वाटावा अशी पद्धत निवडा. मनातील गोष्ट स्पष्टपणे बोला, प्रत्येक गोष्टीचा विचार करा, वेळ द्या. कारण बाप झाला हाच त्याचा गुन्हा नाही, तर तुमच्या आयुष्याला आकार देणारा सर्वात मोठा ऋणानुबंध आहे.
सदर लघुपट आर्वी तालुक्यातील नंदनवन फिल्म प्रोड्यकॅशन चे दिग्दर्शक तथा लेखक रितेश अढाऊ व दिग्दर्शक रोशन बोन्द्रे यांनी तयार केला आहे. तयार झाल्यानंतर बाप हाच माझा गुन्हा हा लघुपट सर्वसामान्य प्रेक्षकांसाठी यूट्यूबवर प्रकाशित करण्यात आला. सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाला तरुणाईकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण भागातील वास्तव जाणवून देणारा प्रभावी प्रयत्न म्हणून तो चर्चेत आला आहे.
यामध्ये योगेश जाधव (विरुळ, वर्धा) यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. सदर लघुपटास निखिल नंदेश्वर, पूजा कांबळे, दीपक पाटील, जयेश शिरभाते, गौरव बनसोडे, संतोष तायडे आदींनी सहकार्य केले. सदर लघुपटाच्या यशाबद्दल जिल्ह्याभरातून कौतुक केले जात आहे.
शुक्रवार दिः १२ सप्टेंबर २०२५ रोजी पुण्यातील पंडित जवाहर नेहरू संस्कृती भवन येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पारितोषिक वितरणाचा भव्य सोहळा पार पडला. जेष्ठ सिने अभिनेते अरुण नलावडे, प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे, प्रभाकर मोरे, देविका दफ्तरदार, असित रेडीज, सुनिल गोडबोले, प्रभाकर मोरे यांच्या हस्ते कलाकार योगेश जाधव, निखिल नंदेश्वर, पूजा कांबळे, दीपक पाटील, जयेश शिरभाते, गौरव बनसोडे, संतोष तायडे, रितेश अढाऊ, दिपाली, रोशन बोंद्रे, धनश्री जाधव यांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.