Baramati News: बारामतीत अजितदादा पवार यांच्या स्मारकाला मंजुरी; ३.५ एकर जागेत उभारणार भव्य प्रेरणास्थळ

बारामतीत अजितदादा पवार यांच्या स्मारकाला मंजुरी; ३.५ एकर जागेत उभारणार भव्य प्रेरणास्थळ
बारामती नगर परिषदेने दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी दिली. आधुनिक संग्रहालय, माहितीपट आणि जनतेसाठी खुले प्रेरणास्थळ उभारण्याची संकल्पना.
पुणे २४ जून २०२६ : बारामती नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ३.५ एकर जागेत भव्य स्मारक उभारण्याच्या प्रस्तावाला एकमताने मंजुरी देण्यात आली. बारामती, पुणे जिल्हा आणि महाराष्ट्राच्या विकासात त्यांच्या योगदानाचा गौरव करत नगर परिषद सदस्यांनी हे स्मारक भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, अशी भावना व्यक्त केली. या निर्णयामुळे बारामतीमध्ये विकासदृष्टी, जनसेवा आणि नेतृत्वाचा वारसा जपणारे एक महत्त्वाचे स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सभेदरम्यान नगराध्यक्ष सचिन सातव यांनी स्मारकाच्या संकल्पनेची माहिती देताना अजितदादा पवार यांच्या विकासदृष्टीचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, या ठिकाणी उंच मनोरा उभारून विकसित होत असलेली बारामती नागरिकांना पाहता यावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, आता त्याच ठिकाणी त्यांच्या स्मृती जपणारे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या कार्याचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे स्मारक महत्त्वपूर्ण ठरेल, असे त्यांनी नमूद केले.
सभागृहातील चर्चेत अनेक नगरसेवकांनी स्मारकाचे स्वरूप जागतिक दर्जाचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. स्मारकामध्ये अजितदादा पवार यांच्या सार्वजनिक जीवनाचा माहितीपट, डिजिटल प्रदर्शन, चलचित्रे आणि त्यांच्या कार्याचा सविस्तर आढावा मांडण्यात यावा, अशी सूचना करण्यात आली. याशिवाय त्यांच्या जीवनाशी संबंधित छायाचित्रे, दस्तऐवज, सन्मानचिन्हे, वापरातील वस्तू आणि ऐतिहासिक नोंदींचे संग्रहालय उभारण्याचाही प्रस्ताव मांडण्यात आला. त्यामुळे नागरिकांना आणि विशेषतः तरुण पिढीला त्यांच्या कार्याची माहिती मिळण्यास मदत होईल, असे मत सदस्यांनी व्यक्त केले.
नगरसेवक अमोल कावळे यांनी स्मारक सर्वसामान्यांसाठी कायमस्वरूपी खुले आणि विनामूल्य असावे, अशी मागणी केली. अजितदादा पवार यांनी आयुष्यभर जनतेसाठी काम केले असल्याने त्यांच्या स्मारकासाठी कोणतेही प्रवेश शुल्क आकारू नये, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे त्यांनी सांगितले. या सूचनेलाही सभागृहातील अनेक सदस्यांनी पाठिंबा दर्शविला.
दरम्यान, स्मारकाच्या प्रस्तावावर चर्चा सुरू असताना काही राजकीय मुद्द्यांमुळे सभागृहात वातावरण तापल्याचेही पाहायला मिळाले. नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी पूर्वी अजितदादा पवार यांच्याविरोधात झालेल्या वादग्रस्त वक्तव्यांच्या वेळी काही सदस्यांनी मौन का बाळगले होते, असा प्रश्न उपस्थित केला. स्मारक उभारणीच्या विषयावर पुढाकार घेणाऱ्यांनी त्या वेळीही त्यांच्यासाठी ठाम भूमिका घ्यायला हवी होती, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर सभागृहात काही काळ तीव्र चर्चा रंगली.
अखेरीस सर्व सदस्यांनी एकमताने ठरावाला मंजुरी देत हे स्मारक केवळ स्मृतीस्थळ न राहता विकास, जनसेवा आणि नेतृत्वाचे प्रतीक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. बारामतीच्या विकासाशी जोडलेले अजितदादा पवार यांचे कार्य आणि त्यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान जतन करण्यासाठी हे स्मारक महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञान, माहितीपर दालन आणि संग्रहालयाच्या माध्यमातून हे स्मारक भविष्यात बारामतीतील एक महत्त्वाचे आकर्षण आणि प्रेरणादायी केंद्र ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare