Bengaluru Money Heist: RBI अधिकारी बनून 5.76 कोटींचा दरोडा; पोलिसांनी 60 तासांत उघड केला हाय-टेक गुन्हा
Bengaluru Money Heist: RBI अधिकारी बनून 5.76 कोटींचा दरोडा; पोलिसांनी 60 तासांत उघड केला हाय-टेक गुन्हा
बंगळूरुमधील एटीएम कॅश-व्हॅनवर 5.76 कोटींच्या दरोड्याचा पर्दाफाश अवघ्या 60 तासांत. आरोपींनी RBI अधिकारी बनून कॅश व्हॅन लुटली; आतल्या लोकांचा सहभाग उघड. तीन आरोपी अटकेत.
सायली मेमाणे
पुणे २२ नोव्हेंबर २०२५ : नेटफ्लिक्सवरील ‘मनी हाइस्ट’ सीरिजलाही लाजवेल असा थरारक आणि हाय-टेक दरोडा बंगळूरुच्या मध्यवर्ती भागात घडला आणि त्यानंतर पोलिसांनी अवघ्या 60 तासांत त्याचा पर्दाफाश करून आरोपींना गजाआड केले. 19 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी घडलेल्या या सिनेमॅटिक दरोड्यात तब्बल 7.11 कोटी रुपये घेऊन जाणारी सीएमएस कंपनीची कॅश व्हॅन ‘आरबीआय अधिकारी’ बनलेल्या दरोडेखोरांनी अडवली आणि 5.76 कोटी रुपये लुटून पळ काढला. या प्रकरणाने कॅश-हँडलिंग सुरक्षेतील त्रुटींचा मोठा प्रश्न समोर आणला आहे.
दुपारी सुमारे 12:48 वाजता जयनगर डेअरी सर्कलजवळ अशोक पिलर परिसरात ही घटना घडली. आरोपींनी स्वत:ला RBI चे अधिकारी असल्याचे सांगत सुरक्षारक्षकांना दिशाभूल केली. शस्त्रांचा धाक दाखवत त्यांनी कॅश बॉक्स ताब्यात घेतला आणि अवघ्या काही मिनिटांत घटनास्थळावरून फरार झाले. 1:16 वाजेपर्यंत त्यांनी कॅश व्हॅन सोडून दिली होती. या घटनेनंतर सिद्धापुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या गुन्ह्यात सर्वात मोठी भूमिका ‘इनसायडर्स’ची होती, हे तपासात स्पष्ट झाले. कॅश व्हॅनच्या हालचाली, सुरक्षा प्रोटोकॉल आणि मार्गाची गुप्त माहिती कंपनीतील सद्य आणि माजी कर्मचाऱ्यांनी आरोपींपर्यंत पोहोचवली होती. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये सीएमएसचा एक विद्यमान कर्मचारी, माजी कर्मचारी आणि पोलीस दलातील एका कॉन्स्टेबलचा समावेश आहे. कॅश व्हॅनच्या मार्गाची रेकी, वेळापत्रक आणि गाडीची हालचाल याची सर्व माहिती या तीनही जणांनी गुन्हेगारांना उपलब्ध करून दिल्याचे उघड झाले.
दरोड्याची योजना अत्यंत सूक्ष्म पद्धतीने रचण्यात आली होती. हा कट सुमारे तीन महिने आधी आखण्यात आला. आरोपींनी 15 दिवस परिसराची आणि कॅश व्हॅनच्या धावती माहितीची रेकी केली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मोबाइल फोन वापरल्यास लोकेशन ट्रेस होईल याची कल्पना असल्याने त्यांनी सर्व मोबाइल घरीच ठेवले. संवादासाठी वेगवेगळ्या भाषांचा वापर करून त्यांनी तपासात गोंधळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरोड्यात एकाच वाहनाचा नव्हे, तर अनेक वाहनांचा वापर करण्यात आला आणि नंबर प्लेट्स वारंवार बदलण्यात आल्या.
बंगळूरुचे पोलीस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन या गुन्ह्याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, या गुन्ह्यात एकूण 6 ते 8 जण सहभागी होते आणि तपासासाठी कर्नाटकासह तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि गोवा अशा अनेक राज्यांमध्ये चौकशी करण्यात आली. एकूण 30 हून अधिक संशयितांची चाचपणी करण्यात आली. तपास पथकात 11 पोलिस निरीक्षक, 2 एसीपी आणि 6 सीसीबी अधिकाऱ्यांचा समावेश होता.
पोलिसांनी 5.76 कोटी रुपयांची रोकड, दरोड्यात वापरलेले ट्रंक आणि एक वाहन जप्त केले. या प्रकरणात कॅश व्हॅनने RBI च्या अनेक सुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले. सुरक्षा प्रोटोकॉलमधील त्रुटींवर चर्चा करण्यासाठी सीएमएस कंपनीच्या प्रमुखांना समन्स पाठवण्यात आले आहे.
या जलद तपासाबद्दल पोलीस आयुक्तांनी पथकाचे अभिनंदन केले असून, त्यांना 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. या प्रकरणाने भविष्यातील कॅश-हँडलिंग सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण केले आहेत. इनसायडर्सच्या सहभागामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information