Bhigwan News: अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यवसाय ठप्प; वीटदर वाढल्याने बांधकाम क्षेत्र संकटात

0
Bhigwan News: अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यवसाय ठप्प; वीटदर वाढल्याने बांधकाम क्षेत्र संकटात

Bhigwan News: अवकाळी पावसाने वीटभट्टी व्यवसाय ठप्प; वीटदर वाढल्याने बांधकाम क्षेत्र संकटात

भिगवण परिसरात हंगामबदलाच्या पावसामुळे वीटभट्टी व्यवसायावर मोठा परिणाम. वीट उत्पादन ठप्प झाल्याने दर वाढले आणि बांधकाम क्षेत्र अडचणीत. व्यावसायिक आणि मजुरांचे नुकसान वाढत चालले.

सायली मेमाणे

पुणे ३१ ऑक्टोबर २०२५ : भिगवण परिसरात हंगामबदलाच्या अवेळी आलेल्या पावसाने वीटभट्टी उद्योगाचे चक्र पूर्णपणे विस्कळीत केले आहे. ऑक्टोबर अखेरीस सुरू होणाऱ्या वीट सिझनच्या तयारीचा अंतिम टप्पा सुरू असतानाच मुसळधार पावसाने उत्पादन प्रक्रिया ठप्प झाली आहे. यामुळे केवळ वीट उत्पादनच थांबलेले नाही, तर त्याचे परिणाम बांधकाम क्षेत्रावरही थेट जाणवू लागले आहेत. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार डिसेंबरपर्यंत ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट आणि हलक्या सरींचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे या परिस्थितीतून लवकर सावरणे कठीण असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे.

भिगवण परिसरात सध्या सुमारे 25 ते 30 वीटभट्ट्या कार्यरत आहेत. परतीच्या पावसाने माती ओलसर झाल्यामुळे वीट वाळवण्याची प्रक्रिया थांबली आहे. ओलसर मातीमुळे तयार वीट योग्य दर्जाच्या राहत नाहीत, त्यामुळे उत्पादन स्थगित ठेवण्याचा निर्णय अनेक व्यावसायिकांनी घेतला आहे. यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून, बाजारात वीटांच्या दरात झपाट्याने वाढ झाली आहे. सध्या प्रति हजार वीटांमागे सुमारे 1000 ते 1200 रुपयांनी दर वाढले आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.

या दरवाढीचा परिणाम बांधकाम क्षेत्रावर दिसून येत आहे. आधीच वाढत्या सिमेंट आणि वाळू दरांमुळे अडचणीत असलेल्या बांधकाम व्यावसायिकांना आता वीटदराच्या वाढीचा तडाखा बसला आहे. काही ठिकाणी काम बंद ठेवावे लागले असून, प्रकल्पांच्या वेळापत्रकावर त्याचा परिणाम झाला आहे. बांधकाम सामग्रीच्या पुरवठ्यातील अडचणींमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे मजूर, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि संबंधित घटकांच्या रोजीरोटीवर या परिस्थितीचा फटका बसत आहे.

वीटभट्टी उद्योजक रमेश वांझखडे यांनी सांगितले की, “दरवर्षी या काळात आम्ही उत्पादन सुरू करतो. पण यंदा परतीचा पाऊस सतत पडत आहे. माती वाळत नसल्याने वीट तयार करता येत नाही. खर्च वाढला, उत्पादन थांबले आणि तोटा वाढला. सिझन वेळेत सुरू झाला नाही, तर पुढील काही महिन्यांत मोठे नुकसान सहन करावे लागेल.”

दुसरीकडे, बांधकाम व्यावसायिकांच्या मते वाढत्या वीटदरामुळे काम थांबवण्याशिवाय पर्याय नाही. “सद्यस्थितीला वीट दर इतके वाढले आहेत की काही ठिकाणी बांधकाम कामे थांबवावी लागली आहेत. नवीन भट्ट्या सुरू होऊन पुरवठा सुरळीत होईपर्यंत थांबणेच योग्य ठरेल, अन्यथा खर्च नियंत्रणात ठेवणे शक्य होणार नाही,” असे एका ठेकेदाराने सांगितले.

भिगवण परिसरातील वीटभट्टी उद्योग हा स्थानिक अर्थचक्राचा महत्त्वाचा भाग आहे. या व्यवसायावर हजारो कामगार, ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आणि बांधकाम कामगारांची उपजीविका अवलंबून आहे. सततच्या पावसामुळे या सर्व घटकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला असून, दिवाळीनंतरही परिस्थिती सुधारण्याची शक्यता कमी दिसत आहे.

हवामान विभागाने पुढील काही दिवसांत हलक्या सरींचा अंदाज वर्तवला आहे, त्यामुळे वीटभट्टी सिझन आणखी उशिरा सुरू होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना सिझनच्या विलंबामुळे आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत असून, बांधकाम क्षेत्रालाही याचा दीर्घकालीन फटका बसू शकतो.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed