Bhosari Election Celebration: भोसरीत विजयाचा जल्लोष; गुलाल, ढोल-ताशे आणि दुचाकी रॅलीने परिसर दणाणला
Bhosari Election Celebration: भोसरीत विजयाचा जल्लोष; गुलाल, ढोल-ताशे आणि दुचाकी रॅलीने परिसर दणाणला
भोसरी, दिघी आणि इंद्रायणीनगर परिसरात निवडणूक निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी गुलाल, फटाके, ढोल-ताशे आणि दुचाकी रॅलीने भव्य विजय उत्सव साजरा केला.
पुणे १७ जानेवारी २०२६ : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर भोसरी, दिघी आणि इंद्रायणीनगर परिसरात प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीच्या चुरशीनंतर दुपारी चित्र स्पष्ट होताच विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरत विजयाचा जल्लोष साजरा केला. भोसरी गावठाण ते इंद्रायणीनगरपर्यंत गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि दुचाकी रॅली काढून संपूर्ण परिसर पिवळा, भगवा आणि गुलाबी रंगात रंगवून टाकण्यात आला.
भोसरीतील निवडणुकीसाठी दोन ठिकाणी मतमोजणी केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. प्रभाग क्रमांक ३, ४, ५ आणि ७ ची मतमोजणी भोसरी गावठाणातील बापुजी बुवा चौक येथील कबड्डी प्रशिक्षण केंद्रात पार पडली, तर प्रभाग क्रमांक २, ६, ८ आणि ९ ची मतमोजणी इंद्रायणीनगरमधील संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलात झाली. सकाळी आठ वाजल्यापासूनच या दोन्ही केंद्रांच्या बाहेर उमेदवार, कार्यकर्ते आणि समर्थकांची मोठी गर्दी जमली होती. प्रा. रामकृष्ण मोरे कमान परिसर तर कार्यकर्त्यांच्या गर्दीने अक्षरशः ओसंडून वाहत होता.
सकाळच्या सत्रात निकालाबाबत तणाव आणि उत्सुकता दिसून येत होती. मात्र दुपारनंतर जसे-जसे विजयाचे आकडे स्पष्ट होऊ लागले, तसा कार्यकर्त्यांचा संयम सुटला आणि जल्लोषाला सुरुवात झाली. विजयाचे अधिकृत प्रमाणपत्र घेऊन उमेदवार केंद्राबाहेर येताच समर्थकांनी त्यांना खांद्यावर उचलून धरले. “कोण आला रे कोण आला…” अशा घोषणा, पक्षांचे जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजराने संपूर्ण परिसर निनादून गेला. भंडाऱ्याची उधळण आणि गुलालामुळे अनेक कार्यकर्त्यांचे चेहरे पूर्णपणे रंगले होते.
विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. शेकडो दुचाकींची रॅली भोसरीतील मुख्य रस्त्यांवरून मार्गस्थ झाली. विशेषतः बुलेट गाड्यांच्या सायलेन्सरचा आवाज, फटाक्यांचा धडाका आणि मोठ्या साऊंड सिस्टीमवरील गाणी यामुळे परिसरात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. हातात पक्षाचे झेंडे घेऊन निघालेल्या या रॅलीमुळे काही काळ वाहतूक संथ झाली होती, मात्र पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
बापुजी बुवा चौक परिसरात एकीकडे भाजप तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते. दोन्ही बाजूंनी विजयाचा जल्लोष सुरू असला तरी कोणताही वाद किंवा अनुचित प्रकार घडला नाही. राजकीय मतभेद बाजूला ठेवत प्रत्येक पक्षाने आपापल्या उमेदवारांच्या विजयाच्या घोषणा देत मिरवणुका पुढे नेल्या. या राजकीय सलोख्यामुळे उत्सवाला अधिकच रंग चढला.
पिवळा, भगवा आणि गुलाबी अशा विविध रंगांच्या गुलालामुळे भोसरीचा परिसर अक्षरशः रंगीबेरंगी झाला होता. निवडणूक निकालानंतरचा हा विजय सोहळा भोसरी परिसरासाठी अविस्मरणीय ठरला असून, कार्यकर्त्यांच्या उत्साहातून आगामी काळातील राजकीय हालचालींचे संकेतही मिळत आहेत.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information