BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेचा निकाल आज; 23 मतमोजणी कक्षात कडक बंदोबस्तात मोजणी

0
BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेचा निकाल आज; 23 मतमोजणी कक्षात कडक बंदोबस्तात मोजणी

BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेचा निकाल आज; 23 मतमोजणी कक्षात कडक बंदोबस्तात मोजणी

BMC Election Result 2026 Live: मुंबई महापालिका निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी 10 वाजता सुरू होणार. 23 मतमोजणी कक्ष सज्ज, कडक पोलीस बंदोबस्तात मुंबईच्या सत्तेचा फैसला.


पुणे १६ जानेवारी २०२६ : मुंबई महानगरपालिकेच्या 2025–2026 सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आता अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. गुरुवार, 15 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण मुंबईत मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पडली असून आज शुक्रवार, 16 जानेवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मुंबईची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे केवळ राजकीय पक्षच नव्हे तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

या निवडणुकीसाठी मुंबईतील विविध ठिकाणी एकूण 23 मतमोजणी कक्ष सज्ज करण्यात आले आहेत. प्रत्येक कक्षात स्वतंत्र निवडणूक निर्णय अधिकारी (आरओ) नियुक्त करण्यात आले असून मतमोजणीसाठी आवश्यक सर्व तांत्रिक व प्रशासकीय तयारी पूर्ण करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या सविस्तर आराखड्याला महापालिका आयुक्त व जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी मंजुरी दिली आहे.

भारतीय निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार आणि आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करत ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. मतमोजणी केंद्रांबाहेर तसेच परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. वाहतूक व्यवस्थेतही आवश्यक बदल करण्यात आले असून मतमोजणी केंद्रांच्या आजूबाजूच्या परिसरात वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे.

महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी मतमोजणी व्यवस्थेचा प्रत्यक्ष आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, विशेष कर्तव्य अधिकारी (निवडणूक) विजय बालमवार, सहाय्यक आयुक्त विश्वास शंकरवार, अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी फारोग मुकादम, सहाय्यक आयुक्त गजानन बेल्लाले, उपजिल्हा दंडाधिकारी महादेव किरवले तसेच सर्व 23 निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. निवडणूक आयोगाच्या प्रत्येक सूचनेनुसार मतमोजणी पारदर्शक, सुरक्षित आणि वेळेत पूर्ण केली जाईल, असा विश्वास गगराणी यांनी व्यक्त केला आहे.

महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार 227 प्रभागांसाठी ही मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाच्या अखत्यारित स्ट्राँग रूम आणि मतमोजणी स्थळे निश्चित करण्यात आली आहेत. या सर्व ठिकाणांना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस विभागाकडून आवश्यक मान्यता देण्यात आली असून सुरक्षा यंत्रणा पूर्णतः सज्ज ठेवण्यात आली आहे.

मुंबई महापालिकेवर कोणता पक्ष किंवा आघाडी सत्ता स्थापन करणार, याचा निर्णय आजच्या निकालातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या उत्सुकतेने निकालाची वाट पाहत आहेत. बीएमसी निवडणूक निकाल 2026 हा केवळ मुंबईपुरताच मर्यादित नसून राज्याच्या राजकारणाची दिशा ठरवणारा ठरणार असल्याचे मानले जात आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed