मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या अंतर्गत निधीवाटपावरून ठिणगी ‘स्वकीयां’मध्येच नाराजीचा सूर

मुंबई महानगरपालिकेत भाजपच्या अंतर्गत निधीवाटपावरून ठिणगी 'स्वकीयां'मध्येच नाराजीचा सूर
बृहन्मुंबई महानगरपालिका मधील विकासनिधी वाटपावरून भाजपमध्ये अंतर्गत नाराजी वाढली. अमित साटम समर्थक नगरसेवकांना अधिक निधी मिळाल्याचा आरोप, तर AIMIM नगरसेवकांना कोटींची तरतूद केल्याची चर्चा.
मुंबई महानगरपालिकेवर दीर्घकाळ असलेली शिवसेनेची सत्ता उलथवून लावल्यानंतर, आता पालिकेच्या तिजोरीवर भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. सत्ता मिळाल्यानंतर सर्वच प्रभागांत विकासाची गंगा पोहोचेल, अशी आशा भाजप नगरसेवकांना होती. मात्र, प्रत्यक्ष कारभार सुरू झाल्यानंतर भाजपच्या अंतर्गत वर्तुळातच निधीवाटपावरून नाराजीचा मोठा स्फोट झाला आहे. पक्षातील काही विशिष्ट नगरसेवकांना झुकते माप दिले जात असल्याची कुजबूज आता उघड संघर्षाच्या दिशेने जात असल्याचे चित्र दिसत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार अमित साटम यांच्या मतदारसंघातील नगरसेवकांवर निधीची मोठी खैरात केली जात असल्याचा मुख्य आरोप आहे. साटम यांचे नातेवाईक रोहन राठोड यांना तब्बल ९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्यांच्या मतदारसंघातील इतर नगरसेवकांनाही प्रत्येकी ६ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. निधीवाटपातील हा असमतोल आणि साटम समर्थकांना मिळणारे प्राधान्य यामुळे पक्षातील इतर ज्येष्ठ नगरसेवकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, यामुळे भाजपमध्ये गृहकलह पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दुसरीकडे,महानगरपालिकेच्या ८०० कोटींच्या विकासनिधी वाटपात विरोधकांबाबत अवलंबलेल्या दुजाभावामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त होत आहे. भाजपने आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नगरसेवकांच्या पदरात केवळ २५ लाखांचा तुटपुंजा निधी टाकला आहे. मात्र, विशेष बाब म्हणजे एमआयएमच्या आठ नगरसेवकांवर प्रशासनाने मोठी मेहरबानी दाखवत त्यांना प्रत्येकी २ ते ३ कोटींचा निधी बहाल केला आहे. ठाकरे गटाची कोंडी करताना एमआयएमला झुकते माप देण्याची ही राजकीय खेळी असल्याची चर्चा आता रंगली आहे.
निधीवाटपाचे हे निकष विकासकामांपेक्षा ‘राजकीय जवळीक’ आणि ‘गटबाजी’वर आधारित असल्याचा गंभीर प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. समान निधी न मिळाल्यास प्रभागातील विकासकामे ठप्प होतील आणि याचा फटका आगामी निवडणुकांमध्ये बसेल, अशी भीती नाराज नगरसेवकांकडून व्यक्त होत आहे. या संपूर्ण प्रकरणावर आणि आपल्यावर होत असलेल्या आरोपांवर अमित साटम आता काय भूमिका मांडतात आणि पक्षनेतृत्व या वादावर कसा पडदा टाकते, याकडे राजकीय धुरिणांचे लक्ष लागले आहे
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information