BrahMos Missile : भारतासाठी सामरिक वरदान ठरलेले ‘ब्राह्मोस’, पुतिन यांच्या निर्णयामुळे चीनलाही मिळाला नकार!
ब्राह्मोस प्रकल्पामागे व्लादिमीर पुतिन यांची वैयक्तिक भूमिका
ब्राह्मोस प्रकल्पामागे व्लादिमीर पुतिन यांची वैयक्तिक भूमिका; चीनलाही तंत्रज्ञान देण्यास स्पष्ट नकार, भारत-रशिया मैत्रीचा ऐतिहासिक अध्याय.
सायली मेमाणे
२६ जून २०२५ : भारताच्या सामरिक तंत्रज्ञानाचा कणा ठरलेले ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र आज जागतिक पातळीवर भारताच्या ताकदीचे प्रतिक बनले आहे. मात्र, या प्रकल्पामागे असलेली खरी प्रेरणा आणि जागतिक राजकारणातील निर्णायक क्षण आता उघडकीस आले आहेत. ब्राह्मोस प्रकल्पाचे जनक आणि भारताचे ज्येष्ठ संरक्षण वैज्ञानिक डॉ. ए. शिवथनु पिल्लई यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाचे खुलासे केले आहेत. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राच्या यशामागे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचा वैयक्तिक हस्तक्षेप होता, तर चीनसारख्या महासत्तेलाही त्यांनी या तंत्रज्ञानापासून दूर ठेवले.
१९९१ च्या आखाती युद्धानंतर भारताने आपले संरक्षण तंत्रज्ञान अधिक प्रगत करण्याचा निर्णय घेतला. याच पार्श्वभूमीवर डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पिल्लई यांनी एक अद्वितीय सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र तयार करण्याचा संकल्प केला. त्यासाठी रशियाशी भागीदारी सुरू झाली. या प्रक्रियेत व्लादिमीर पुतिन यांनी केवळ राजकीय पाठिंबा दिला नाही, तर प्रकल्पाच्या प्रत्येक टप्प्यावर लक्ष देऊन अनेक अडथळे दूर केले. त्यांनी तांत्रिक, धोरणात्मक आणि प्रशासनिक पातळीवर हस्तक्षेप करून रशियन टीमला भारतात शांततेत आणि अखंड काम करण्याची संधी दिली.
या प्रकल्पाची माहिती बाहेर आल्यानंतर चीननेही रशियाशी संपर्क साधून ब्राह्मोसप्रमाणेच तंत्रज्ञान मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र पुतिन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, ब्राह्मोस हा भारत आणि रशियामधील शासकीय करार आहे आणि तो कोणत्याही परिस्थितीत भंग केला जाणार नाही. ही माहिती अटल बिहारी वाजपेयी यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आली. त्यानंतर संरक्षणमंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्याद्वारे ती माहिती थेट डॉ. पिल्लई यांच्यापर्यंत आली. पुतिन यांचा हा निर्णय केवळ धोरणात्मक नव्हता, तर भारत-रशिया मैत्रीचा एक सुवर्ण अध्याय ठरला.
ब्राह्मोस क्षेपणास्त्राचे सामर्थ्य ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान दिसून आले, जेव्हा त्याने पाकिस्तानच्या एका एअरबेसवर अचूक हल्ला करत त्यांना धक्का दिला. पाकिस्तानकडे या हल्ल्याला उत्तर देण्यासारखे कोणतेही तंत्रज्ञान नव्हते, आणि यामुळे भारताच्या सामरिक बळाची प्रचिती जगाला आली.
ब्राह्मोस क्षेपणास्त्र केवळ भारतासाठी नव्हे तर आता इतर देशांसाठीही आकर्षण ठरले आहे. अनेक देश भारतासोबत ब्राह्मोस खरेदीसाठी वाटाघाटी करत आहेत. यामध्ये रशियाचे माजी अध्यक्ष दिमित्री मेदवेदेव यांचाही महत्त्वाचा सहभाग होता. यामुळे ब्राह्मोस हे भारताचे पहिले यशस्वी निर्यातक्षम क्षेपणास्त्र बनले आहे.
या खुलाशामुळे हे स्पष्ट होते की व्लादिमीर पुतिन हे भारताचे फक्त राजकीय मित्र नाहीत, तर सामरिक आणि तांत्रिक पातळीवरही एक विश्वासू भागीदार आहेत. चीनसारख्या महाशक्तीलाही नकार देऊन त्यांनी भारताच्या आत्मनिर्भर संरक्षण योजनेला प्रोत्साहन दिले, ही बाब भारताच्या इतिहासातील महत्त्वाचा क्षण ठरतो.