केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ; MSP वाढ आणि 57 नवीन केंद्रीय विद्यालयांना मंजुरी
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ
केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले की मंत्रिमंडळाने केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3% वाढ, रब्बी पिकांसाठी MSP वाढ आणि 57 नवीन केंद्रीय विद्यालयांना मान्यता दिली आहे.
सायली मेमाणे
पुणे १ ऑक्टोबर २०२५ : केंद्र सरकारने लाखो कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तांना दिलासा देणारा महत्वाचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले आहे की केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत केंद्रातील सर्व कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्क्यांची वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या महागाईदर वाढत असताना, घरगुती खर्चाचा ताण कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे केंद्र सरकारचे लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारक यांना थेट फायदा होणार आहे. महागाई भत्ता हा कर्मचार्यांना मिळणाऱ्या पगाराचा एक महत्वाचा घटक मानला जातो आणि तो दर सहा महिन्यांनी सुधारित केला जातो. आता नव्या वाढीसह कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल आणि त्यांना आर्थिक आधार मिळेल.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्त्याची भर पडल्यामुळे त्यांच्या खिशात अधिक रक्कम जमा होणार आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती सतत वाढत असल्याने या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. विशेष म्हणजे, याचा लाभ केवळ कर्मचाऱ्यांनाच नव्हे तर निवृत्तांना देखील मिळणार आहे. पेन्शनधारकांना देखील महागाई भत्त्याची सुधारित रक्कम लागू होईल. त्यामुळे केंद्र सरकारच्या लाखो कुटुंबांना हा निर्णय थेट उपयोगी ठरणार आहे.
फक्त कर्मचारीच नव्हे तर शेतकऱ्यांसाठी देखील मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. सरकारने रब्बी हंगामातील पिकांसाठी किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपी वाढवण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादित पीक बाजारात विकताना तोटा होऊ नये यासाठी सरकार किमान आधारभूत किंमत निश्चित करते. दरवर्षी यामध्ये वाढ करून शेतकऱ्यांचा उत्पन्नाचा स्तर वाढवण्याचा प्रयत्न केला जातो. या वेळी रब्बी पिकांच्या एमएसपीत वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हमी मिळणार आहे. त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेत चैतन्य येईल आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळेल.
याशिवाय शिक्षण क्षेत्रासाठी देखील मंत्रिमंडळ बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. देशात 57 नवीन केंद्रीय विद्यालये उघडण्यास मान्यता देण्यात आली आहे. सध्या अनेक ठिकाणी केंद्रीय विद्यालयांच्या शाखांची मागणी होत होती. या शाळांमुळे देशभरातील हजारो विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. विशेषतः सरकारी कर्मचाऱ्यांची मुले जे अनेकदा बदल्या होण्यामुळे विविध ठिकाणी शिक्षण घेतात त्यांच्यासाठी केंद्रीय विद्यालये मोठा आधार ठरतात. नव्याने सुरू होणाऱ्या शाळांमुळे ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची संधी मिळणार आहे.
सरकारच्या या तिन्ही निर्णयांचा वेगवेगळ्या घटकांवर सकारात्मक परिणाम होणार आहे. कर्मचाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्यांचा खरेदीशक्ती वाढेल. शेतकऱ्यांना योग्य दर मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावेल. तर नवीन केंद्रीय विद्यालयांमुळे शिक्षण क्षेत्रात सुधारणा होऊन पुढील पिढी घडवण्यास हातभार लागेल. या तिन्ही निर्णयांना एकत्रितपणे देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला गती देणारे पाऊल मानले जात आहे.
यापूर्वी अनेकदा कर्मचाऱ्यांकडून महागाई भत्त्यात वाढ करण्याची मागणी करण्यात आली होती. त्याचप्रमाणे शेतकरी संघटनाही एमएसपी वाढवण्याबाबत सातत्याने आवाज उठवत होत्या. शिक्षण क्षेत्रासाठी देखील केंद्रीय विद्यालयांची मागणी अनेक भागांत होत होती. त्यामुळे या सर्व मागण्यांना प्रतिसाद देत केंद्र सरकारने एकाच वेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे स्पष्ट होते. दिवाळीपूर्वीच हा दिलासा मिळाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये आणि पालकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.