Central Railway Megablock: मुंबई–पुणे एक्स्प्रेस रद्द, लोकलही बंद; 19 तासांचा मोठा ब्लॉक जाहीर
मुंबई–पुणे एक्स्प्रेस रद्द, लोकलही बंद; 19 तासांचा मोठा ब्लॉक जाहीर
Central Railway Megablock: कर्जत यार्ड पुनर्डभारणी आणि आधुनिक सिग्नलिंग सिस्टीमसाठी पळसदरी–भिवपुरी विभागात मध्य रेल्वेने 19 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या ब्लॉकमुळे मुंबई–पुणे मार्गावरील अनेक एक्स्प्रेस आणि लोकल गाड्या रद्द होणार आहेत.
सायली मेमाणे
पुणे १० ऑक्टोबर २०२५ : मुंबई–पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मध्य रेल्वेने कर्जत यार्ड पुनर्डभारणी आणि आधुनिक सिग्नलिंग प्रणालीच्या नॉन-इंटरलॉकिंग कामांसाठी पळसदरी ते भिवपुरी या विभागात तब्बल 19 तासांचा मेगाब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक शनिवारी दुपारी 12.20 वाजल्यापासून सुरू होऊन रविवारी पहाटे 7.20 वाजेपर्यंत चालणार आहे. या कालावधीत रेल्वे वाहतूक पूर्णपणे बंद राहणार असल्याने प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोयींचा सामना करावा लागणार आहे.
मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जत यार्डाचे आधुनिकीकरण आणि सिग्नलिंग सिस्टीमचे उन्नतीकरण हे रेल्वे सेफ्टी आणि कार्यक्षमतेसाठी आवश्यक आहे. या तांत्रिक कामांमुळे पळसदरी–भिवपुरी दरम्यान रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद राहील. त्यामुळे या मार्गावरील सर्व गाड्या रद्द किंवा पर्यायी मार्गावर वळवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे या कालावधीत मुंबई–पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा अडथळा निर्माण होणार आहे.
या मेगाब्लॉकचा सर्वाधिक परिणाम दैनंदिन प्रवासी आणि व्यावसायिक वर्गावर होणार आहे. अनेक लोकप्रिय एक्स्प्रेस गाड्या या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात 12125/12126 सीएसएमटी–पुणे–सीएसएमटी प्रगती एक्स्प्रेस, 12123/12124 डेक्कन क्वीन एक्स्प्रेस, 11008 पुणे–सीएसएमटी डेक्कन एक्स्प्रेस, 12128 पुणे–सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस आणि 22106 पुणे–सीएसएमटी इंद्रायणी एक्स्प्रेस यांचा समावेश आहे. तसेच 11030 कोल्हापूर–सीएसएमटी कोयना एक्स्प्रेस आणि 11302 बेंगळुरू–सीएसएमटी एक्स्प्रेस या गाड्या केवळ पुणे स्थानकापर्यंतच चालवल्या जाणार आहेत. पुण्यापासून मुंबई विभाग या गाड्यांसाठी पूर्णपणे बंद राहील.
याशिवाय, शनिवारी एकूण पाच लोकल ट्रेनसुद्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्जत–भिवपुरी मार्गावर प्रवास करणाऱ्या दैनंदिन लोकल प्रवाशांना देखील या मेगाब्लॉकचा मोठा फटका बसणार आहे. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना वेळेआधीच सूचना देत सांगितले आहे की, त्यांनी प्रवासाचे नियोजन या ब्लॉकचा विचार करून करावे.
या ब्लॉकदरम्यान काही गाड्यांना पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे, त्यामुळे प्रवास वेळेत उशीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मध्य रेल्वेने स्पष्ट केलं आहे की, ही कामं पूर्ण झाल्यानंतर कर्जत यार्डचे सिग्नलिंग सिस्टम अधिक आधुनिक आणि सुरक्षित होईल. या उन्नतीकरणामुळे आगामी काळात रेल्वे वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
दरम्यान, या ब्लॉकमुळे प्रवाशांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, सोशल मीडियावरही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाला प्रश्न विचारले आहेत. तथापि, रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, या तांत्रिक सुधारणांमुळे भविष्यात अपघाताची शक्यता कमी होईल आणि गाड्यांचा वेळेचा अचूकपणा वाढेल.
मुंबई–पुणे हा देशातील सर्वाधिक गजबजलेला रेल्वे मार्ग मानला जातो. या मार्गावर दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. त्यामुळे 19 तासांचा हा मेगाब्लॉक रेल्वे प्रवासावर मोठा परिणाम करणार आहे. रेल्वेने प्रवाशांना आवाहन केलं आहे की, त्यांनी पर्यायी वाहतुकीचा वापर करावा आणि आवश्यकतेनुसार प्रवासाचे नियोजन बदलावं.