Central Railway Revenue Boost: पुणे विभागात 7 महिन्यांत 15.17 कोटी दंड; फुकट्या प्रवाशांवर कारवाई वाढली

0
पुणे विभागात 7 महिन्यांत 15.17 कोटी दंड; फुकट्या प्रवाशांवर कारवाई वाढली

पुणे विभागात 7 महिन्यांत 15.17 कोटी दंड; फुकट्या प्रवाशांवर कारवाई वाढली

मध्य रेल्वेने एप्रिल ते ऑक्टोबर 2025 दरम्यान 23.76 लाख विनातिकिट प्रवाशांना पकडले. पुणे विभागातून 15.17 कोटी दंड वसूल; एकूण महसुलात 14% वाढ. वंदे भारत पुणे–नांदेड सेवा लवकरच सुरू.

सायली मेमाणे

१४ नोव्हेंबर २०२५ मध्य रेल्वेने 2025–26 या आर्थिक वर्षात एप्रिल ते ऑक्टोबर 2025 दरम्यान विनातिकिट आणि अवैध तिकिटासह प्रवास करणाऱ्यांवर मोठी मोहीम राबवली असून त्यातून तब्बल 23.76 लाख प्रवाशांना प्रवास नियमांचे उल्लंघन करताना पकडण्यात आले. मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या 22.09 लाख होती. यंदा या कारवाईत 8 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे. केवळ पुणे विभागातून 15.17 कोटी रुपयांची दंडरक्कम वसूल झाली असून, ही आकडेवारी विभागाच्या महसुलातील मोठी वाढ दर्शवते.

एकूण कारवाईत मध्य रेल्वेने सर्व विभाग मिळून 141.27 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 124.36 कोटींच्या तुलनेत ही वाढ तब्बल 14 टक्के आहे. फक्त ऑक्टोबर 2025 महिन्यातच 3.71 लाख प्रवाशांकडून 24.81 कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला असून, हा आकडा मागील ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत 95% वाढ दर्शवतो. यावरून या वर्षी तपासणी आणि कारवाईचा स्तर मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला असल्याचे स्पष्ट होते.

विभागनिहाय महसूल पाहता भुसावळ विभाग 51.74 कोटींच्या दंडासह अव्वल स्थानावर आहे. मुंबई विभागाने 40.59 कोटी, नागपूरने 15.62 कोटी, पुण्याने 15.57 कोटी, सोलापूराने 6.72 कोटी तर मुख्यालयाने 11.03 कोटींची दंडरक्कम वसूल केली आहे. यामुळे मध्य रेल्वेच्या सर्व विभागांमध्ये तिकीट तपासणीबाबत कडक पावले उचलली गेल्याचे दिसून येते.

या कारवाईसाठी मध्य रेल्वेने स्टेशन तपासणी, सापळा तपासणी, फोर्ट्रेस ड्राईव्ह आणि विशेष मोहिमा राबवल्या. प्रवासी तक्रारींचा विशेषतः मुंबई उपनगरी विभागातील AC लोकल संदर्भातील वाढता ताण लक्षात घेत, मध्य रेल्वेने विशेष वातानुकूलित लोकल तिकीट तपासणी पथकही स्थापन केले आहे. हे पथक दररोज सरासरी 368 प्रवाशांवर कारवाई करते. विनातिकिट प्रवासाबाबत नागरिकांनी अधिक जागरूक राहावे, वैध तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन मध्य रेल्वेकडून करण्यात आले.

तपासणी मोहिमा वाढल्याने रेल्वेचा महसूलही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. विनातिकिट प्रवास हा रेल्वे प्रशासनासाठी सर्वात मोठा आर्थिक तोटा मानला जातो. अशा प्रवाशांवर कारवाई केल्याने रेल्वेला अतिरिक्त निधी मिळण्यास मदत होते, त्याचबरोबर सुरक्षेची आणि शिस्तीची पातळीही उच्चावते.

दरम्यान, मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी आणखी एक महत्त्वाची माहिती जाहीर केली आहे. देशातील अनेक महत्त्वाच्या मार्गांवर वंदे भारत एक्सप्रेस धावत असताना, आता पुणे–नांदेड दरम्यान दुसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. ही सेमी हाय-स्पीड ट्रेन सुरू झाल्यास पुणे ते नांदेड प्रवासाचा वेळ थेट 7 तासांपर्यंत कमी होणार आहे. या प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात असून डिसेंबर अखेर किंवा जानेवारी 2026 पर्यंत सेवा सुरू करण्याची तयारी रेल्वे विभागाने दर्शवली आहे.

मध्य रेल्वेची विनातिकिट प्रवासावरील कारवाई आणि वाढता महसूल हा प्रवासी व सुरक्षा व्यवस्थेसाठी महत्त्वाचा संकेत मानला जात आहे. येत्या काळात आणखी तंत्रज्ञानाधारित तपासणी प्रणाली आणि स्मार्ट तिकीट नियंत्रण यंत्रणा लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed