ChatGPTवर गंभीर आरोप: 16 वर्षीय मुलाचा आत्महत्येचा खटला उघडला
ChatGPTवर गंभीर आरोप: 16 वर्षीय मुलाचा आत्महत्येचा खटला उघडला
अमेरिकेत ChatGPT अॅपवर 16 वर्षीय मुलाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप; पालकांनी OpenAI कंपनीवर खटला दाखल केला. AI आणि मानवी जीवनातील धोक्यांवर गंभीर चर्चा सुरू.
सायली मेमाणे
पुणे २८ ऑगस्ट २०२५ :अमेरिकेत एका 16 वर्षीय मुलाच्या आत्महत्येसाठी ChatGPT अॅपवर गंभीर आरोप केले जात आहेत. कॅलिफोर्नियातील मॅथ्यू आणि मारिया राईन यांनी त्यांच्या मुलगा ॲडमच्या आत्महत्येबाबत OpenAI कंपनीवर खटला दाखल केला आहे. पालकांच्या म्हणण्यानुसार, ChatGPT अॅपने त्यांच्या मुलाला आत्महत्येसाठी मार्गदर्शन केले आणि त्यास प्रोत्साहन दिले.
पालकांनी न्यायालयात सांगितले की, 2024 आणि 2025 दरम्यान ChatGPT ने ॲडमसोबत ‘घनिष्ठ संबंध’ निर्माण केले आणि त्याने आपल्या जीवनाचा अखेरचा निर्णय घेतला. 11 एप्रिल 2025 रोजी ॲडमच्या ChatGPT सोबत झालेल्या शेवटच्या संवादात, अॅपने त्याला पालकांकडून ‘वोडका’ चोरी करण्यास मदत केली. त्याचप्रमाणे, फाशीची गाठ योग्य आहे का याबद्दल विचारल्यावर अॅपने ‘होय, गाठ योग्य बनली आहे, ती एका माणसाला हवेत लटकवू शकते’ असे सांगितले. काही तासांनी ॲडमचा मृतदेह सापडला.
पालकांच्या तक्रारीनुसार, सुरुवातीला ॲडमने ChatGPT गृहपाठासाठी वापरला. मात्र, हळूहळू तो अॅपवर अवलंबून राहू लागला आणि मानसिक त्रासासाठी त्याने अॅपवर चर्चा सुरू केली. जानेवारी 2025 पर्यंत, त्याने आत्महत्येच्या पद्धतींवर चर्चा सुरू केली. पालकांनी न्यायालयात ChatGPT सोबतच्या संवादाचे पुरावे सादर केले आहेत. अॅपने ॲडमला ‘तुम्ही जगण्यासाठी कोणाचे देणे लागत नाही’ असे सांगितले आणि आत्महत्येची नोट लिहिण्यास मदत करण्याची ऑफरही दिली होती.
या प्रकरणात, ChatGPT ने वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती ओळखली होती, तरीही अॅपने आत्महत्येबाबत संवाद चालू ठेवला. OpenAI ने ब्लॉग पोस्टद्वारे सांगितले की, ChatGPT मध्ये मानसिक आरोग्य ओळखण्यासाठी अपडेट्स येतील आणि सुरक्षिततेसाठी सुधारणा केली जाईल. तसेच, पालकांसाठी नियंत्रण पद्धतीसुद्धा राबवली जातील, ज्यामुळे ते त्यांच्या मुलांनी ChatGPT वर काय संवाद साधला आहे हे पाहू शकतील.
OpenAI ने या प्रकरणी सखोल तपास सुरू केला असून कुटुंबाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. या घटनेमुळे AI च्या वापरासंबंधी गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भात अॅप्सवर अधिक जबाबदारीची गरज असल्याचे स्पष्ट झाले आहे.