Chhatrapati Sambhajinagar: नवीन वर्षात शहराला 24 तास पाणी! 2,740 कोटींच्या योजनेतील मोठा अडथळा दूर

0
Chhatrapati Sambhajinagar: नवीन वर्षात शहराला 24 तास पाणी! 2,740 कोटींच्या योजनेतील मोठा अडथळा दूर

Chhatrapati Sambhajinagar: नवीन वर्षात शहराला 24 तास पाणी! 2,740 कोटींच्या योजनेतील मोठा अडथळा दूर

छत्रपती संभाजीनगरच्या 24 तास पाणीपुरवठा योजनेला हिरवा कंदील. प्रशासक जी. श्रीकांत यांनी MUIDCL सोबत 822 कोटींच्या कर्जासाठी करार पूर्ण करून 2,740 कोटींच्या प्रकल्पाचा अडथळा दूर केला.

सायली मेमाणे

७ ऑक्टोबर २०२५ : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला 24 तास पाणीपुरवठा प्रकल्प अखेर मार्गी लागला असून नवीन वर्षात शहरवासीयांना अखंडित पाण्याचा पुरवठा मिळण्याची शक्यता अधिक बळावली आहे. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांनी महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनी (MUIDCL) सोबत गुरुवारी मुंबईत 822 कोटी रुपयांच्या कर्जकरारावर स्वाक्षरी करत या महत्त्वाकांक्षी योजनेतील सर्वात मोठा आर्थिक अडथळा दूर केला आहे.

एकूण 2,740 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा प्रकल्पात केंद्र सरकारचा 25 टक्के, राज्य शासनाचा 45 टक्के, तर महापालिकेचा 30 टक्के निधी समाविष्ट आहे. केंद्र आणि राज्य शासनाने आपला निधी वेळेत उपलब्ध करून दिला होता, मात्र उर्वरित महापालिकेच्या 822 कोटींच्या हिश्श्यासाठी मागील आठ–नऊ महिन्यांपासून कर्ज प्रक्रियेत अडथळे येत होते. हा प्रमुख आर्थिक अडसर आता दूर झाल्यामुळे प्रकल्पाला अंतिम गती मिळाली आहे.

पुणे महापालिकेच्या धर्तीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये चोवीस तास नळाद्वारे पाणी देण्याची योजना महापालिकेने तयार केली. शहरातील जीर्ण जलवाहिन्या, गळती, अनियमित जलपुरवठा आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता आधुनिक व स्मार्ट पाणी व्यवस्थापनाची गरज अधोरेखित होत होती. जायकवाडी धरणात मुबलक साठा असला तरी जीर्ण झालेल्या जुन्या पाइपलाइनमुळे लाखो लिटर पाणी वाया जात होते. याच समस्येवर तोडगा म्हणून नव्या जलवाहिन्या, नवीन टाक्या आणि सशक्त वितरण जाळे उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.

राजकीय स्तरावर श्रेयवादाने या प्रकल्पात वेळोवेळी अडथळे निर्माण झाले. मंजूर झालेली योजना साडेतीन हजार कोटींच्या घरात पोहोचण्यामागे अनेक वर्षांचा विलंब कारणीभूत होता. तथापि प्रशासक जी. श्रीकांत यांनी मागील सहा महिन्यांत एकामागून एक अडथळे दूर करत प्रकल्पाला गती दिली. आर्थिक टंचाईमुळे अडकलेल्या प्रकल्पासाठी महापालिकेचा वाटा भरण्यासाठी MUIDCL कडून कर्ज मिळवणे हा सर्वात महत्त्वाचा टप्पा होता. अखेर करार पूर्ण झाल्यानंतर आता प्रत्यक्ष कामाला वेग येणार आहे.

अमृत-2 योजनेअंतर्गत हा 2,740 कोटी रुपयांचा पाणी पुरवठा प्रकल्प राबवण्यात येत असून या कामाची जबाबदारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर सोपविण्यात आली आहे. हैदराबादस्थित जीवीपीआर (GVPR) कंपनीला कंत्राट देण्यात आले असून प्रकल्पाचे सुमारे 70 ते 75 टक्के काम पूर्णत्वाकडे आहे. उर्वरित कामांना आर्थिक गती मिळाल्याने जलदगतीने पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न प्रशासन करणार आहे.

प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या मुदतीत पाणी योजनेची कामे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. कर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्याने या योजनेसमोरील मोठा अडथळा दूर झाला आहे. पुढील काळात कर्जफेडीसाठी महापालिकेची आर्थिक स्थिती सुधारावी लागेल आणि त्यासाठी आवश्यक निर्णय घेतले जातील.”

शहरातील नागरिकांना सध्या आठवड्यातून दोन ते तीन वेळा पाणी मिळते. काही भागांमध्ये गळती, कमी दाब आणि अनियमित वेळापत्रकामुळे मोठ्या प्रमाणावर तक्रारी समोर येतात. 24 तास पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर नागरिकांना नियोजित, स्वच्छ आणि अखंडित पाणी मिळेल, अशी अपेक्षा आहे. या प्रकल्पामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक स्मार्टपणे केले जाईल, गळतीत घट होऊन साठा वाढेल आणि जलव्यवस्थापनाच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा मिळेल.

प्रकल्पाचा अडथळा दूर झाल्यानंतर आता आगामी काही महिन्यांत प्रत्यक्ष कामाला अंतिम गती मिळेल आणि नवीन वर्षापर्यंत संभाजीनगरकरांना 24 तास पाणी मिळण्याचा मार्ग अधिक स्पष्ट झाला आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed