Daund News: मुळा-मुठा नदीत पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह
मुळा-मुठा नदीत पोत्यात बांधलेला पुरुषाचा मृतदेह
दौंड येथील मुळा-मुठा नदी पात्रात पोत्यात बांधलेल्या पुरुषाचा मृतदेह आढळला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरू केला आहे.
सायली मेमाणे
पुणे ३ ऑक्टोबर २०२५ : दौंड येथील खामगाव गावच्या हद्दीत मुळा-मुठा नदी पात्रात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह सोमवारी आढळला. मृतदेह ३० ते ३५ वयोगटातील असून पावसामुळे नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने अज्ञात आरोपींनी या परिस्थितीचा फायदा घेत हा खून करून मृतदेह नदीत फेकल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मुळा-मुठा नदीत मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती खामगावचे पोलीस पाटील प्रदीप जगताप यांनी यवत पोलीस ठाण्याला दिली. घटनेची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अक्षय मोरे, हवालदार गणेश करचे, संदिप देवकर, विनायक हाके व दत्तात्रय काळे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला.
सदर पुरुषाच्या शरीरावर काही विशिष्ट गोंदण्या आहेत, ज्यामुळे त्याची ओळख पटण्यास मदत होऊ शकते. उजव्या हातावर बदाम आणि महादेवाची पिंड गोंदलेली आहे, तसेच दंडावर सिंहाचे टैंट्यु आणि डाव्या हाताच्या पोटरीवर बदामासह “SLG” हे गोंदलेले आहे. मृतदेह लाल टीशर्ट आणि राखाडी पॅन्टमध्ये होता, तसेच कमरेला चामडी बेल्ट होती.
अद्याप मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश सपांगे करीत आहेत. पोलिसांनी जनता आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, जर या पुरुषाची ओळख असलेल्या कोणालाही माहिती असेल, तर यवत पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये चिंता निर्माण केली आहे. पावसाळ्यामुळे नदीचे पाणी वाढल्याने या प्रकारात अज्ञात आरोपींना फायदा झाला, असे पोलिसांनी स्पष्ट केले. यवत पोलीस तपास करत असून घटनास्थळी आणखी साक्षीपत्रे आणि पुरावे गोळा केले जात आहेत. स्थानिक प्रशासन आणि पोलिसांनी नागरिकांना सुरक्षिततेसाठी सजग राहण्याचा इशारा दिला आहे.