Delhi Blast Aftermath: मुंबई पोलिस हाय अलर्टवर! चर्चगेट, CSMT, दादर, बांद्रा स्टेशनवर मोठी तपासणी

Delhi Blast Aftermath: मुंबई पोलिस हाय अलर्टवर! चर्चगेट, CSMT, दादर, बांद्रा स्टेशनवर मोठी तपासणी
दिल्लीतील लाल किल्ला परिसरातील कार स्फोटानंतर मुंबई पोलिस हाय अलर्टवर. चर्चगेट, CSMT, दादर, बांद्रा यांसारख्या महत्त्वाच्या स्टेशनवर तपासणी सुरू. स्फोटात अनेकांचा मृत्यू झाल्याची शक्यता, NSG-NIA पथक तपासात.
सायली मेमाणे
पुणे २२ नोव्हेंबर २०२५ : दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात शनिवारी संध्याकाळी झालेल्या भीषण कार स्फोटाने देश हादरला आहे. या स्फोटात मोठे नुकसान झाले असून, प्राथमिक माहितीनुसार अनेकांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप उघड झाले नसले तरी त्यामागे दहशतवादी कारवायांचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की जवळील रेड जैन मंदिरासह परिसरातील दुकानांचे काच फुटले. ही घटना लाल किल्ल्यापासून अवघ्या 800 मीटर अंतरावर घडल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठी चिंता निर्माण झाली आहे.
दिल्लीतील या स्फोटानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ हाय अलर्ट जारी केला आहे. मुंबईसारख्या महानगरात मोठी गर्दी असलेल्या ठिकाणी सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. विशेषतः चर्चगेट, CSMT, दादर, बांद्रा यांसारख्या महत्त्वाच्या रेल्वे स्थानकांवर मोठ्या प्रमाणात तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सामानाची तपासणी, स्टेशन परिसरातील व वाहनतळातील पाहणी आणि संशयित हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.
घटनेबद्दल मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही तासांपासून लाल किल्ला परिसरातील मेट्रोच्या गेट क्रमांक 1 जवळ एक कार उभी होती. त्याच कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटानंतर कार पूर्णत: जळून खाक झाली आणि त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या तीन वाहनांनाही आग लागली. संध्याकाळच्या वेळी या परिसरात मोठी गर्दी असल्याने अफरातफर माजली. स्फोट होताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि आग विझवण्याचे काम सुरू केले.
दरम्यान, दिल्ली पोलिसांनी 7 नोव्हेंबर ते 10 नोव्हेंबरदरम्यान संशयितांना अटक केली होती. त्या चौघांमध्ये आयसिसचे चार दहशतवादी असल्याचे समोर आल्यानंतर स्फोटातील संशय अधिकच वाढला आहे. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या स्फोटकांच्या आधारे सुरक्षा यंत्रणा अत्यंत सतर्क झाली आहे. NSG, NIA आणि बॉम्ब स्क्वॉडच्या पथकांनी घटनास्थळी दाखल होऊन तपास सुरू केला आहे. जखमी आणि मृत व्यक्तींना NNGC रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मुंबई पोलिसांकडून सर्व संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा जास्त वाढवण्यात आली आहे. स्टेशन, मॉल्स, मार्केट, पर्यटनस्थळे आणि सार्वजनिक ठिकाणांवर कडेकोट तपासणी सुरू आहे. या घटनेला दहशतवादी स्वरूप असल्याची भीती वर्तवली जात असून, मुंबईसारख्या शहरात कोणतीही अघटित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी गस्त वाढवली आहे.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनुसार, दिल्लीतील स्फोटाचे स्वरूप गंभीर असून, त्याचा धागा आधी अटक केलेल्या संशयितांशी जोडला जाऊ शकतो. त्यामुळे सध्या प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेवण्यात येत आहे. प्रवाशांना अनावश्यक गर्दी टाळण्याचे आणि संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दिल्लीतील स्फोटामुळे देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तपास पूर्ण होईपर्यंत आणि कारण समोर येईपर्यंत मुंबई पोलिसांकडून अलर्ट मोड कायम ठेवला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare