Dhule News : मोबाइल हॅकिंगच्या भीतीने फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या; शिरपूर तालुक्यातील धक्कादायक घटना
मोबाइल हॅकिंगच्या भीतीने फार्मसी विद्यार्थ्याची आत्महत्या
धुळे जिल्ह्यातील ताजपूरी गावात मोबाईल हॅकिंगची भीती मनात धरून 20 वर्षीय फार्मसी विद्यार्थ्याने आत्महत्या केली. या प्रकरणाची पोलीस तपास सुरू असून, परिसरात खळबळ उडाली आहे.
सायली मेमाणे
धुळे ७ जुलै २०२५ : धुळे : शिरपूर तालुक्यातील ताजपूरी गावात एका बी. फार्मसीच्या विद्यार्थ्याने केवळ 20 व्या वर्षी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बंटी उर्फ किशन जितेंद्र सनेर असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून, तो सनेर कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता. प्राथमिक माहितीनुसार, किशनने आपला मोबाईल हॅक होऊन त्यातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याच्या भीतीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना किशनच्या घरातच घडली. साडीच्या साह्याने त्याने गळफास घेतला आणि कुटुंबीयांनी तातडीने त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. किशनच्या आत्महत्येमुळे संपूर्ण गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे. मृत्यूमागील संभाव्य कारण म्हणजे त्याचा मोबाईल हॅक झाला आणि त्यातील वैयक्तिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होण्याची भीती त्याच्या मनात होती, अशी माहिती स्थानिक पातळीवरून मिळत आहे.
या घटनेची नोंद थाळनेर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पोलीस अधिकारी शत्रुघ्न पाटील यांच्या माहितीनुसार मोबाईल हॅकिंगचा संशय तपासात आहे. किशनच्या मोबाईलची तपासणी केली जाणार असून, त्याच्या निकटवर्तीय मित्रांकडून माहिती घेतली जाणार आहे. सोशल मीडियावरील कोणत्याही प्रकारचा सायबर गुन्हा घडला असेल तर संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.
ही घटना केवळ एका युवकाच्या आयुष्याचा अंत करणारी नाही, तर डिजिटल युगातील मानसिक आरोग्य व सायबर सुरक्षेच्या धोक्यांकडेही गंभीर इशारा करणारी आहे. यामुळे पालकांनी आपल्या मुलांशी सतत संवाद साधणे आणि विद्यार्थ्यांनीही कोणत्याही संकटाच्या वेळी आत्मघातकी विचार न करता मदतीचा हात मागणे गरजेचे आहे.