Dombivli News: एका महिलेचे दोन वोटर आयडी; नाव-पत्ता सेम, फोटो वेगळा; निवडणूक आयोगावर सवाल
एका महिलेचे दोन वोटर आयडी; नाव-पत्ता सेम, फोटो वेगळा; निवडणूक आयोगावर सवाल
डोंबिवलीत एका महिलेचे नाव-पत्ता एकच असलेले पण फोटो वेगवेगळे अशी दोन वोटर आयडी कार्ड मिळाली. निवडणूक आयोगाच्या भोंगळ कारभारावर ठाकरे गटाची टीका; प्रकरण तापण्याची शक्यता.
सायली मेमाणे
७ ऑक्टोबर २०२५ : डोंबिवलीत मतदार यादीतील गोंधळ वाढत असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका महिलेच्या नावाने दोन वेगवेगळे वोटर आयडी कार्ड घरी पोहोचल्याने प्रशासनाच्या कामकाजावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. नाव आणि पत्ता एकच असलेल्या या दोन्ही कार्डांवर मात्र फोटो वेगवेगळे असल्याचे दिसून आले. त्यामुळे हा प्रकार कसा घडला आणि यामुळे निवडणूक प्रक्रियेवर किती परिणाम होऊ शकतो, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्या पत्नींच्या नावे दोन वोटर कार्ड मिळाले ते सेवानिवृत्त पोलिस अधिकारी आहेत, त्यामुळे हा मुद्दा अधिकच संवेदनशील ठरला आहे.
डोंबिवलीत राहणारे सेवानिवृत्त पोलिस अधिकारी अशोक कुलकर्णी यांनी काही महिन्यांपूर्वी वोटर कार्डसाठी प्रक्रिया पूर्ण केली होती. दोन महिन्यांपूर्वी पोस्टाद्वारे त्यांच्या घरी एकूण पाच वोटर आयडी कार्ड आले. मात्र त्यात त्यांच्या पत्नी अर्चना कुलकर्णी यांच्या नावे दोन कार्ड आढळले. या दोन्ही कार्डांवरील नाव आणि पत्ता एकच असला तरी एकावर दुसऱ्याच महिलेचा फोटो असल्याचे स्पष्ट दिसत होते. हा प्रकार पाहून कुलकर्णी दांपत्य चक्रावून गेले असून त्यांनी हा मुद्दा थेट निवडणूक आयोगापर्यंत नेण्याचा निर्णय घेतला आहे.
अशोक कुलकर्णी यांनी सांगितले की, “मी पोलिस खात्यात 2007 पर्यंत सेवा बजावली आहे. पाच वोटर आयडी कार्ड घरी आल्यावर पत्नींच्या नावे दोन कार्ड दिसले. त्यावर एकाच पत्त्यावर वेगळी व्यक्तीचे चित्र कसे काय आले, हा मोठा प्रश्न आहे. पोस्टाने आलेल्या या कार्डांबाबत मी निवडणूक आयुक्तांना कळवणार आहे. हा गोंधळ कसा झाला, याचा जाब विचारणार आहे.” त्यांच्या या भूमिकेमुळे प्रकरण अधिक गांभीर्याने घेतले जात आहे.
या प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाने निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, एका निवृत्त पोलिस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावे असा प्रकार घडत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय? निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार उघड झाला असून मतदार याद्यांतील चुका निवडणुकीत गोंधळ निर्माण करू शकतात, असा आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे पदाधिकारी राजेंद्र सावंत म्हणाले, “कुलकर्णी आमच्या शहर कार्यालयात आले. दोन वोटर कार्डांमुळे त्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. मग सामान्य नागरिकांनी काय करायचे? जाब आपण सरकारला विचारायचा की आयडी कार्ड तयार करणाऱ्या अधिकार्यांना, हा मुद्दाच मोठा झाला आहे.”
मतदार यादी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेत काही चुका होतात हे मान्य असले तरी अशा प्रकारचे गंभीर गोंधळ मतदान प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवर थेट प्रश्न उभा करतात. एका व्यक्तीच्या नावावर दोन वेगवेगळे फोटो असलेली दोन मतदार ओळखपत्रे मिळणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. यामुळे ओळख पडताळणी, मतदान केंद्रावरील प्रक्रिया, आणि प्रत्यक्ष मतदानाच्या पारदर्शकतेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करून योग्य जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
डोंबिवलीत मतदार नोंदणी, हटवणे, स्थलांतर आणि फोटो बदल यामध्ये होत असलेल्या अनियमिततेबाबत अनेक तक्रारी आधीच दाखल झाल्या आहेत. त्यामुळे हा प्रकार बाहेर आल्यानंतर नागरिकांमध्ये प्रशासनाविषयी अविश्वास वाढला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत स्पष्ट भूमिका घेऊन चुकीचा डेटा तपासून, तातडीने दुरुस्ती केली पाहिजे, अन्यथा आगामी निवडणुकांमध्ये गोंधळ वाढू शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.
हे प्रकरण सध्या राजकीयदृष्ट्या तापले आहे. आरोप–प्रत्यारोप सुरु असून निवडणूक आयोगाने तात्काळ चौकशी सुरू करावी, अशी एकमुखी मागणी केली जात आहे.