Dombivli News: दुचाकीवरून आलेल्या ‘बंटी-बबली’ची अनोखी चोरी; सोसायटीसमोरचे कचऱ्याचे डबे लंपास

Dombivli News: दुचाकीवरून आलेल्या ‘बंटी-बबली’ची अनोखी चोरी; सोसायटीसमोरचे कचऱ्याचे डबे लंपास
डोंबिवली एमआयडीसी परिसरातील सोसायट्यांमधून कचऱ्याचे डबे चोरीला जात असल्याच्या घटना वाढल्या आहेत. दुचाकीवरून आलेल्या जोडप्याने डबे चोरल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून रहिवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
पुणे १० जून २०२६ : डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरात एक आगळावेगळा चोरीचा प्रकार समोर आला असून, सोसायट्यांमध्ये ठेवण्यात आलेले कचऱ्याचे डबेच आता चोरट्यांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येत आहे. दुचाकीवरून आलेल्या एका जोडप्याने सोसायटीसमोरील कचऱ्याचे डबे चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून या घटनेमुळे रहिवाशांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
डोंबिवलीतील विविध सोसायट्या आणि इमारतींमध्ये ओला व सुका कचरा वेगळा संकलित करण्यासाठी चाक असलेले विशेष कचरा डबे ठेवण्यात आले आहेत. हे डबे नागरिकांच्या सोयीसाठी वापरले जातात. घंटागाडी आल्यानंतर कमी वेळेत कचरा संकलन होण्यासाठी या डब्यांचा मोठा उपयोग होतो. मात्र अलीकडच्या काळात अशा डब्यांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास डोंबिवली एमआयडीसी निवासी भागातील सिमेन्स सोसायटीसमोर ठेवलेले कचऱ्याचे डबे दुचाकीवरून आलेल्या एका जोडप्याने चोरून नेले. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्यामध्ये दोघेही डबे घेऊन जाताना स्पष्टपणे दिसत आहेत.
या कचरा डब्यांची बाजारातील किंमत अंदाजे तीन हजार रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे काही चोरटे हे डबे चोरी करून भंगारात विकत असल्याचा किंवा सेकंडहँड स्वरूपात विक्री करत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वीही परिसरात अशा काही घटना घडल्याची चर्चा स्थानिक नागरिकांमध्ये सुरू आहे.
या घटनेनंतर सोसायटी व्यवस्थापन आणि रहिवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सार्वजनिक सुविधांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तूंची चोरी होणे ही गंभीर बाब असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे स्वच्छता व्यवस्थेवरही परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेतला जाणार आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेऊन परिसरातील गस्त वाढवावी तसेच अशा चोरीच्या घटनांवर अंकुश आणावा, अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे.
डोंबिवली परिसरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. घरासमोरील साध्या वस्तूंपासून सार्वजनिक सुविधांपर्यंत सर्वच वस्तूंवर चोरट्यांची नजर असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करून या प्रकारामागील टोळीचा शोध घ्यावा, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information
FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare