ED Raids on Medical Colleges: महाराष्ट्रासह 10 राज्यांत एकाचवेळी छापेमारी, मोठा भ्रष्टाचार उघड
ED Raids on Medical Colleges: महाराष्ट्रासह 10 राज्यांत एकाचवेळी छापेमारी, मोठा भ्रष्टाचार उघड
ED Raids: महाराष्ट्रासह 10 राज्यांतील 15 ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालयांवरील लाचखोरी आणि भ्रष्टाचार प्रकरणी ईडीची मोठी कारवाई. UGC माजी अध्यक्षांसह अनेक अधिकारी आरोपी; CBI तपासानंतर छापे.
सायली मेमाणे
पुणे २८ नोव्हेंबर २०२५ : वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या गंभीर आरोपांवरून प्रवर्तन निदेशालयाने (ED) देशातील 10 राज्यांमध्ये धडक कारवाई केली आहे. वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देणे, तपासणी प्रक्रिया, रिन्यूअल फाइल्स हाताळणे आणि गोपनीय माहितीची देवाणघेवाण यामधील मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश करत ईडीने गुरुवारी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात, राजस्थान, बिहार, उत्तर प्रदेश आणि दिल्ली अशा 10 राज्यांतील 15 ठिकाणी सर्च ऑपरेशन केले. या कारवाईत 7 वैद्यकीय महाविद्यालयांच्या कॅम्पसचा समावेश असून, संबंधित खाजगी व्यक्ती आणि कॉलेज प्रशासकांचाही तपास सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणाची मुळाशी जाणारी चौकशी केंद्रीय अन्वेषण ब्युरोने (CBI) 30 जून रोजी दाखल केलेल्या FIR पासून सुरू झाली. या FIR मध्ये विद्यापीठ अनुदान आयोगाचे (UGC) माजी अध्यक्ष डी. पी. सिंह यांच्यासह 36 जणांना आरोपी म्हणून नमूद करण्यात आले होते. उल्लेखनीय म्हणजे डी. पी. सिंह हे सध्या मुंबईतील टाटा इंस्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (TISS) चे चान्सलर आहेत. याशिवाय, केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील काही अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाचे कर्मचारी आणि राष्ट्रीय वैद्यकीय आयोग (NMC) चे काही सदस्य यांच्याही नावांचा तपासात समावेश आहे.
सीबीआयच्या चौकशीत उघड झालेल्या माहितीनुसार, अनेक वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता मिळवण्यासाठी तसेच तपासणी दरम्यान अनुकूल निकाल मिळावा म्हणून मोठ्या प्रमणावर लाचखोरी चालत असल्याचे समोर आले. तपासणीला येणाऱ्या अधिकाऱ्यांना लाच देऊन कॉलेजमध्ये खोट्या सुविधा दाखवणे, घोस्ट फॅकल्टी दाखविणे, बनावट रुग्ण दाखविणे, खोटे दस्तऐवज वापरणे अशा गंभीर अनियमितता आढळल्या. काही मध्यस्थांनी सरकारी अधिकाऱ्यांना वर्गीकृत आणि गोपनीय माहिती “विकल्याचे”ही समोर आले आहे. आगामी तपासणीचे वेळापत्रक अगोदरच कळवणे, कोणत्या पॅरामीटर्सवर पास व्हायचे आहे याची माहिती देणे आणि कॉलेजला बनावट व्यवस्था तयार करण्याची मुभा देणे – ही सगळी गैरव्यवहाराची साखळी होती.
या प्रकरणात छत्तीसगडमधील रायपूर येथील श्री रावतपुरा सरकार इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च (SRSIMSR) आणि त्यांच्या प्रमुख रविशंकर जी महाराज, राजस्थानमधील उदयपूर येथील गीतांजली विद्यापीठाचे रजिस्ट्रार मयुर रावल, तसेच मध्य प्रदेशातील इंदूर येथील इंडेक्स मेडिकल कॉलेजचे अध्यक्ष सुरेश सिंह भदोरिया यांच्याही नावांचा उल्लेख आहे. या तिघांवर वैद्यकीय शिक्षणातील अनियमिततेला प्रोत्साहन देणे, मध्यस्थांशी संगनमत करणे आणि तपासणी प्रक्रियेवर प्रभाव टाकण्याचे आरोप आहेत.
सीबीआयच्या FIRनुसार, दिल्लीतील काही सरकारी गटाने वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी, मान्यता आणि नूतनीकरण प्रक्रियेतील गोपनीय फाइल्समध्ये बेकायदेशीर प्रवेश मिळवून देण्यात मदत केली. त्याबदल्यात मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ घेतल्याचा गंभीर आरोप आहे. या व्यवहारांचे पुरावे मिळाल्यानंतर ईडीने मनी लॉन्ड्रिंगच्या गुन्ह्यांतर्गत तपास सुरू केला आणि देशभरात एकाच वेळी सर्च ऑपरेशन राबवले.
वैद्यकीय क्षेत्रातील गुणवत्तेचा आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा थेट संबंध असलेल्या या प्रकारामुळे मोठी खळबळ उडाली आहे. मान्यतेसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा गैरवापर करून, लाच देऊन कॉलेज चालवले जात असतील तर विद्यार्थ्यांचे भविष्य, रुग्णांची सुरक्षा आणि देशातील आरोग्य व्यवस्थेवर त्याचा थेट परिणाम होत असल्याची गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे.
ईडीचा तपास पुढील काही दिवसांत अधिक वेगाने होण्याची शक्यता आहे. या कारवाईतून आणखी मोठी नावे समोर येण्याची संभाव्यता असून, वैद्यकीय शिक्षणातील भ्रष्टाचार उघडपटास आणणारा हा तपास पुढेही गाजणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information