Election 2026: महापौरपदासाठी राजकीय लॉबिंगला सुरुवात, मात्र आरक्षण सोडतीशिवाय नावावर शिक्कामोर्तब नाही

0
Election 2026: महापौरपदासाठी राजकीय लॉबिंगला सुरुवात, मात्र आरक्षण सोडतीशिवाय नावावर शिक्कामोर्तब नाही

Election 2026: महापौरपदासाठी राजकीय लॉबिंगला सुरुवात, मात्र आरक्षण सोडतीशिवाय नावावर शिक्कामोर्तब नाही

महानगरपालिका निवडणूक निकाल 2026 जाहीर झाले असले तरी महापौर कोण होणार याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. आरक्षण सोडतीनंतरच महापौरपदाचा निर्णय होणार असल्याने सर्व पक्ष प्रतीक्षेत आहेत.

पुणे १८ जानेवारी २०२५: राज्यातील २९ महानगरपालिकांचे निवडणूक निकाल जाहीर झाले असून, अनेक ठिकाणी सत्तेचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेषतः भाजपने बहुतांश महानगरपालिकांमध्ये दणदणीत विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र निकाल लागल्यानंतरही सध्या सर्वात मोठा प्रश्न कायम आहे, तो म्हणजे महापौर कोण होणार? निवडणूक निकालानंतर साधारणपणे सर्वोच्च पदासाठी हालचालींना वेग येतो, इच्छुकांकडून लॉबिंग सुरू होते, दावे-प्रतिदावे रंगतात. मात्र यावेळी चित्र काहीसे वेगळे असून, महापौरपदासाठीची प्रतीक्षा वाढलेली दिसत आहे.

या प्रतीक्षेमागचे मुख्य कारण म्हणजे महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत अद्याप न निघणे. महापौर, नगराध्यक्ष किंवा जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडतीद्वारे निश्चित केले जाते. सर्वसाधारण पुरुष किंवा महिला, ओबीसी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय अशा विविध प्रवर्गांनुसार हे आरक्षण ठरवले जाते. यामागचा उद्देश सर्व सामाजिक गटांना सर्वोच्च पद भूषवण्याची संधी मिळावी, हा आहे. मागील कार्यकाळात ज्या प्रवर्गासाठी महापौरपद राखीव होते, तो प्रवर्ग पुढील वेळी वगळला जातो. त्यामुळे यंदा आरक्षण नेमके कुणासाठी असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई महानगरपालिकेत २२७ पैकी भाजपचे ८९ आणि शिंदे गटाचे २९ असे मिळून सत्ताधारी आघाडीचे ११८ सदस्य निवडून आले आहेत. त्यामुळे येथे भाजपचा महापौर होणार हे जवळपास निश्चित मानले जात असले, तरी महापौर कोण होणार हे अद्याप ठरलेले नाही. पुणे आणि नागपूरमध्ये भाजपला एकतर्फी यश मिळाल्याने नेतृत्वाचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, अशी स्थिती आहे. नवी मुंबईत महापौरपदाचा निर्णय गणेश नाईक यांच्या भूमिकेवर अवलंबून राहणार आहे, तर पनवेलमध्येही परिस्थिती साधारण तशीच आहे. वसई-विरारमध्ये हितेंद्र ठाकूर यांचा शब्द अंतिम मानला जात असून, लातूरमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्याने अमित देशमुख कोणते नाव पुढे आणतील, याकडे लक्ष आहे.

तथापि, या सर्व चर्चांना आरक्षणाच्या सोडतीशिवाय कोणतेही ठोस स्वरूप मिळू शकत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील आठवड्यात महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत निघण्याची शक्यता आहे. नगरविकास विभाग यासंदर्भात लवकरच प्रक्रिया सुरू करणार असून, जानेवारीच्या अखेरीस महापौर निवडीची प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदाही नेहमीप्रमाणे सोडतीद्वारेच आरक्षण निश्चित केले जाईल, अशी माहिती समोर येत आहे.

महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी आरक्षणाची सोडत काढली जाते, ही परंपरा आहे. मात्र यावेळी नगरविकास विभागाने निवडणुकीपूर्वी ही सोडत न काढल्याने सध्या सर्वच महानगरपालिकांमध्ये महापौरपदाचा तिढा कायम आहे. परिणामी, सत्ताधारी पक्षांतील इच्छुकांना सध्या थांबून राहावे लागत आहे. सोडत जाहीर झाल्यानंतरच महापौरपद कोणत्या प्रवर्गासाठी राखीव आहे, हे स्पष्ट होईल आणि त्यानंतरच राजकीय हालचालींना खरा वेग येईल. त्यामुळे सध्या राज्यभरात महापौरपदासाठी उत्सुकता शिगेला पोहोचली असली, तरी अंतिम निर्णयासाठी सर्वांनाच थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed