FIH Nations Cup 2026: न्यूझीलंडला 2-0 ने हरवत भारतीय महिला हॉकी संघाचा इतिहास नेशन्स कपवर दुसऱ्यांदा नाव कोरले

0
FIH Nations Cup 2026: न्यूझीलंडला 2-0 ने हरवत भारतीय महिला हॉकी संघाचा इतिहास नेशन्स कपवर दुसऱ्यांदा नाव कोरले

FIH Nations Cup 2026: न्यूझीलंडला 2-0 ने हरवत भारतीय महिला हॉकी संघाचा इतिहास नेशन्स कपवर दुसऱ्यांदा नाव कोरले

भारतीय महिला हॉकी संघाने FIH Nations Cup 2026 च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपद पटकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संघाचे अभिनंदन केले असून हॉकी इंडियाने खेळाडूंना रोख बक्षिसांची घोषणा केली आहे.

पुणे २२ जून २०२६ : भारतीय महिला हॉकी संघाने एफआयएच महिला नेशन्स कप 2026 स्पर्धेत दमदार कामगिरी करत इतिहास रचला आहे. न्यूझीलंडमधील ऑकलंड येथे झालेल्या अंतिम सामन्यात भारताने यजमान न्यूझीलंडचा 2-0 असा पराभव करत विजेतेपदावर आपले नाव कोरले. संपूर्ण स्पर्धेत एकही सामना न गमावता भारतीय संघाने हा किताब जिंकत पुन्हा एकदा जागतिक हॉकीमध्ये आपली ताकद सिद्ध केली आहे.

अंतिम सामन्याची सुरुवात दोन्ही संघांनी आक्रमक पद्धतीने केली. यजमान न्यूझीलंडने सुरुवातीच्या काही मिनिटांत चेंडूवरील नियंत्रण राखण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतीय बचावफळीने त्यांचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरवले. सामन्याच्या चौथ्या मिनिटाला भारताला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे नवनीत कौरने अचूक गोलमध्ये रूपांतर करत संघाला 1-0 अशी महत्त्वाची आघाडी मिळवून दिली.

पहिल्या क्वार्टरमध्येच भारताने दुसरा गोल करत न्यूझीलंडवरील दबाव आणखी वाढवला. 15व्या मिनिटाला मिळालेल्या आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर दीपिकाच्या जोरदार फटक्याला सुनीलिता टोप्पोने अचूक दिशा देत चेंडू गोलपोस्टमध्ये धाडला. या गोलमुळे भारताची आघाडी 2-0 अशी झाली. त्यानंतर भारतीय संघाने शिस्तबद्ध बचाव आणि वेगवान आक्रमणाच्या जोरावर न्यूझीलंडला पुनरागमनाची कोणतीही संधी दिली नाही.

भारतीय महिला संघाची ही मोहीम सुरुवातीपासूनच शानदार ठरली. गट टप्प्यात भारताने अमेरिका, जपान आणि उरुग्वे या तिन्ही संघांवर प्रत्येकी एका गोलच्या फरकाने विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले. उपांत्य फेरीत चिलीचा तब्बल 6-0 अशा मोठ्या फरकाने पराभव करत भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यातील विजयासह भारताने संपूर्ण स्पर्धा अपराजित राहून पूर्ण केली.

एफआयएच महिला नेशन्स कपमधील भारताचे हे दुसरे विजेतेपद आहे. यापूर्वी भारतीय संघाने 2022 मध्येही या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले होते. त्यामुळे या यशामुळे भारतीय महिला हॉकीचा जागतिक स्तरावरील दबदबा आणखी मजबूत झाला आहे.

भारतीय संघाच्या या ऐतिहासिक यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडियाद्वारे संघाचे कौतुक करत खेळाडूंनी देशाला अभिमानाचा क्षण दिल्याचे म्हटले. या विजयामुळे देशातील युवा खेळाडूंना हॉकीकडे आकर्षित होण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, हॉकी इंडियाने विजेतेपदाच्या निमित्ताने प्रत्येक खेळाडूला 3 लाख रुपये आणि सपोर्ट स्टाफमधील प्रत्येक सदस्याला 1.5 लाख रुपयांचे रोख बक्षीस जाहीर केले आहे. या ऐतिहासिक विजयामुळे भारतीय महिला हॉकी संघाच्या आत्मविश्वासात मोठी भर पडली असून आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठीही हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.

Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/

Twitter – https://x.com/NewsDotz

Also Read: Pune’s Latest Information

FacebookWhatsAppXTelegramThreadsLinkedInGmailShare

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed