Flight Ticket Cancellation 2025: विमानाचं तिकीट रद्द करण्यासाठी आता ‘नो चार्ज’; DGCA च्या नव्या नियमांमुळे प्रवाशांमध्ये आनंद

0
विमानाचं तिकीट रद्द करण्यासाठी आता ‘नो चार्ज’; DGCA च्या नव्या नियमांमुळे प्रवाशांमध्ये आनंद

विमानाचं तिकीट रद्द करण्यासाठी आता ‘नो चार्ज’; DGCA च्या नव्या नियमांमुळे प्रवाशांमध्ये आनंद

DGCA च्या नव्या नियमांनुसार प्रवासी तिकीट बुकिंगनंतर ४८ तासांच्या आत कोणत्याही शुल्काशिवाय तिकीट रद्द किंवा बदलू शकतील. एजंटमार्फत बुकिंग केले तरी रिफंडची जबाबदारी एअरलाइन्सचीच राहील.

सायली मेमाणे

४ ऑक्टोबर २०२५ : नवी दिल्ली: हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) लवकरच नवीन नियम लागू करणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना तिकीट रद्द करण्यासाठी मोठी रक्कम द्यावी लागणार नाही. नव्या नियमांनुसार प्रवासी तिकीट बुकिंगनंतर ४८ तासांच्या आत कोणत्याही शुल्काशिवाय तिकीट रद्द किंवा प्रवासाची तारीख बदलू शकतील. हा ‘लुक-इन पीरियड’ प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे.

DGCA ने स्पष्ट केले आहे की या कालावधीत प्रवासी तिकीट रद्द करताना कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, जर नवीन तिकीटाची किंमत जास्त असेल तर केवळ त्या फरकाची रक्कम भरावी लागेल. बुकिंगच्या पाच दिवसांच्या आत देशांतर्गत उड्डाणे किंवा पंधरा दिवसांच्या आत आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी ही सुविधा लागू होणार नाही.

अनेक प्रवासी MakeMyTrip, Yatra किंवा इतर ऑनलाइन ट्रॅव्हल पोर्टल्सद्वारे तिकीट बुक करतात. यावेळी रद्द केल्यावर रिफंड प्रक्रियेला बराच वेळ लागतो. DGCA च्या नव्या प्रस्तावात प्रवाशांचा हा त्रास संपणार आहे. जर तिकीट एजंट किंवा पोर्टलमार्फत बुक केले असेल, तरीही रिफंडची जबाबदारी थेट एअरलाइन्स कंपनीची असेल. एजंट हे एअरलाइन्सचे अधिकृत प्रतिनिधी असल्याने, पैसे परत करण्याची जबाबदारी त्यांच्यावर नसून एअरलाइन्सवर राहील.

DGCA ने नवीन निर्देशानुसार एअरलाइन्सना रिफंडची प्रक्रिया २१ कामकाजाच्या दिवसांत पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे आता प्रवाशांना महिनोमहिने वाट पाहावी लागणार नाही. विशेष म्हणजे, जर कोणत्याही प्रवाशाला वैद्यकीय कारणास्तव प्रवास रद्द करावा लागत असेल, तर एअरलाइन्स त्याला संपूर्ण रक्कम परत देईल किंवा क्रेडिट शेलचा पर्याय देईल, ज्याचा वापर भविष्यात करता येईल.

प्रवाशांच्या सर्वसामान्य चुकांकडेही DGCA ने लक्ष दिले आहे. जर प्रवाशाने तिकीट बुक करताना नावातील स्पेलिंग चुकीचे भरले आणि २४ तासांच्या आत ते सुधारण्याची विनंती केली, तर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. मात्र ही सुविधा केवळ एअरलाइन्सच्या अधिकृत वेबसाइटवरून बुक केलेल्या तिकिटांसाठीच लागू राहील.

DGCA ने या सर्व प्रस्तावित बदलांचे ड्राफ्ट CAR (Civil Aviation Requirement) जारी केले असून ३० नोव्हेंबरपर्यंत सर्व स्टेकहोल्डर्सच्या सूचना मागवण्यात आल्या आहेत. डिसेंबरपर्यंत हे नियम लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जर हे बदल अमलात आले, तर हवाई प्रवाशांसाठी हे मोठं गिफ्ट ठरेल.

सध्या तिकीट रद्दीकरणावर अतिशय जास्त शुल्क आकारले जाते, ज्यामुळे प्रवाशांचा आर्थिक भार वाढतो. DGCA च्या या नवीन नियमांमुळे तिकीट रद्द करणे, नाव दुरुस्ती किंवा तारीख बदलणे हे सर्व अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रवासी-अनुकूल होणार आहे. या नियमांमुळे देशातील हवाई प्रवास क्षेत्रात ग्राहकांच्या हक्कांचे अधिक प्रभावी संरक्षण होईल, आणि प्रवाशांना तणावमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *