Guhagar Local Body Election: महाविकास आघाडीची उमेदवार यादी जाहीर; महायुतीची घोषणा रखडली, नगराध्यक्षपदावर पेच
महाविकास आघाडीची उमेदवार यादी जाहीर; महायुतीची घोषणा रखडली, नगराध्यक्षपदावर पेच
गुहागर नगर पंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने मनसेला सोबत घेत यादी जाहीर केली. मात्र महायुती उमेदवार यादी आणि नगराध्यक्षपदावर पेच कायम. २०१८ मधील ९ जागांच्या बळावर शिवसेनेचा दावा.
सायली मेमाणे
१४ नोव्हेंबर २०२५ : गुहागर नगर पंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीला रंगतदार वळण मिळाले असून, महाविकास आघाडीने आपली उमेदवार यादी जाहीर करताच राजकीय वातावरण आणखी तापले आहे. ठाकरे गटाच्या शिवसेनेने मनसेला दोन जागा देत आपली स्थानिक आघाडी मजबूत केली आहे. मात्र जिल्ह्यात जाहीर झालेल्या महायुतीसाठी गुहागरचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नसल्याने महायुतीची अधिकृत उमेदवार यादी रखडली आहे. सलग चार दिवस एकही उमेदवारी अर्ज दाखल न झाल्याने निवडणुकीच्या रणधुमाळीला अनपेक्षित विराम लागला आहे.
२०१८ च्या निवडणुकीत ‘कुणबी समाज संघटने’च्या एकीच्या जोरावर शहरविकास आघाडीने तब्बल नऊ जागा मिळवून भक्कम कामगिरी केली होती. तर भाजपला फक्त पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. याच पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत कुणबी समाजाची भूमिका निर्णायक ठरणार असून, नगराध्यक्षपदावर कोणत्या पक्षाचा दावा बळकट होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.
महाविकास आघाडीने जाहीर केलेल्या यादीत मनसेला दोन जागा देण्यात आल्या आहेत. उर्वरित नऊ जागांसाठी ठाकरे गट शिवसेनेचे उमेदवार घोषित करण्यात आले आहेत. मात्र नगराध्यक्षपदाचा उमेदवार गुलदस्त्यातच ठेवण्यात आला आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय होणार असून दोन संभाव्य इच्छुकांची नावे चर्चेत आहेत. गतवेळी शहरातील अनेक विकासकामांनंतरही राष्ट्रवादीचे उमेदवार पराभूत झाले होते. त्यामुळे यंदा महाविकास आघाडी अधिक रणनीतीनं निवडणूक लढवत असल्याचे दिसते.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांनी पक्षश्रेष्ठींवर नाराजी व्यक्त करत एकही उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती तालुकाध्यक्ष पद्माकर आरेकर यांनी दिली. यामुळे महाविकास आघाडीच्या स्थानिक गणितात थोडा बदल झाला आहे.
महायुतीमध्ये शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यात जागावाटपाचा मुद्दा गुंतागुंतीचा बनला आहे. २०१८ मध्ये नऊ जागांवर विजय मिळवलेल्या शहरविकास आघाडीतील शिवसेनेचा दावा सर्वात बलवान मानला जातो. शिवसेनेने नऊ जागांसह नगराध्यक्षपदासाठी तीन इच्छुकांची नावे तयार ठेवली आहेत. दुसरीकडे भाजपचा दावा आहे की कुणबी समाज आज त्यांच्या सोबत आहे आणि त्यामुळे नेतृत्वाची संधी भाजपलाही मिळावी.
राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांना मागितलेल्या तीनपैकी दोन जागा देण्याचा प्रस्ताव महायुतीकडून चर्चेत आहे. मात्र नगराध्यक्षपदावर कोणत्या पक्षाचा ताबा राहणार यावर अंतिम निर्णय होणं बाकी आहे. गुरुवारी दुपारपर्यंत महायुतीची अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गुहागर नगर पंचायत निवडणुकीत सलग चार दिवस एकही अर्ज प्रत्यक्ष दाखल झाला नाही. मात्र बुधवारी अनेकांनी ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात केल्याने आजपासून प्रत्यक्ष उमेदवारी दाखल करण्यास सुरुवात होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. निवडणूक प्रशासनाने सर्व तयारी पूर्ण केल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
गुहागरमधील ही बहुकोनी निवडणूक महाविकास आघाडी, महायुती आणि स्थानिक समाजगटांमधील समीकरणांवर आधारित असल्याने निकाल अत्यंत रोचक ठरू शकतात. नगराध्यक्षपदावरील पेच सुटेपर्यंत स्थानिक राजकारणात चुरस कायम राहणार आहे.