HSRP Deadline 2026: 18 फेब्रुवारीपासून कडक कारवाई; नंबरप्लेट नसल्यास दंड अटळ
HSRP Deadline 2026: 18 फेब्रुवारीपासून कडक कारवाई; नंबरप्लेट नसल्यास दंड अटळ
महाराष्ट्रात HSRP नंबरप्लेटसाठी 15 फेब्रुवारी 2026 अंतिम मुदत संपली. 18 फेब्रुवारीपासून राज्यभर तपासणी मोहीम; 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना HSRP अनिवार्य. प्रक्रिया, शुल्क आणि संपूर्ण माहिती वाचा.
पुणे १४ फेब्रुवारी २०२६ : महाराष्ट्रातील वाहनधारकांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (HSRP) संदर्भात महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. राज्य परिवहन विभागाने दिलेली 15 फेब्रुवारी 2026 ही अंतिम मुदत संपल्यानंतर आता 18 फेब्रुवारीपासून राज्यभर कडक अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे. वारंवार मुदतवाढ देऊनही अनेक वाहनधारकांनी HSRP बसवली नसल्यामुळे प्रशासनाने थेट कारवाईचा इशारा दिला आहे. यानंतर कोणतीही अतिरिक्त संधी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व वाहनांसाठी HSRP नंबरप्लेट अनिवार्य करण्यात आली आहे. मात्र, तांत्रिक अडचणी, बुकिंग स्लॉटची कमतरता, फिटमेंट सेंटरची मर्यादित उपलब्धता यांसारख्या कारणांमुळे अनेक वाहनांवर अजूनही जुन्याच नंबरप्लेट आहेत. परिवहन विभागाने आता अशा वाहनांची रस्त्यावर थेट तपासणी करून दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाहनधारकांनी तातडीने HSRP बसवून घेणे गरजेचे झाले आहे.
तपासणीदरम्यान केवळ HSRPच नव्हे तर रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट (RC), वैध विमा, पीयूसी प्रमाणपत्र आणि ड्रायव्हिंग लायसन्स यांचीही पडताळणी केली जाणार आहे. यापैकी कोणतेही कागदपत्र अवैध किंवा अनुपस्थित आढळल्यास दंड आकारला जाईल. त्यामुळे सर्व कागदपत्रे अद्ययावत ठेवणेही तितकेच आवश्यक आहे.
आकडेवारीकडे पाहिल्यास, अजूनही मोठ्या प्रमाणावर वाहने HSRP शिवाय रस्त्यावर धावत आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पात्र असलेल्या 24,28,589 वाहनांपैकी केवळ 8,57,209 वाहनधारकांनी नोंदणी केली आहे. म्हणजेच सुमारे 65 टक्के वाहने अजूनही विना-HSRP आहेत. संपूर्ण राज्याचा विचार करता 1 कोटीहून अधिक वाहने अद्याप जुन्या नंबरप्लेटवर आहेत. हीच बाब लक्षात घेऊन विभागाने कडक पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे.
HSRP नंबरप्लेट ही सामान्य प्लेटपेक्षा अधिक सुरक्षित असून त्यावर खास होलोग्राम, लेझर कोडिंग आणि युनिक आयडेंटिफिकेशन नंबर असतो. यामुळे वाहनांची ओळख पटवणे सुलभ होते तसेच चोरी आणि बनावट नोंदणी रोखण्यास मदत होते. त्यामुळे ही केवळ औपचारिकता नसून सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची पायरी मानली जाते.
HSRP बसवण्यासाठी नागरिकांना ऑनलाइन अर्ज करावा लागतो. अधिकृत संकेतस्थळावर जाऊन संबंधित आरटीओ किंवा कार्यालय निवडून APPLY HSRP या पर्यायावर क्लिक करावे लागते. त्यानंतर वाहनाचा नोंदणी क्रमांक, चेसिस नंबरचे शेवटचे पाच अंक, इंजिन नंबरचे शेवटचे पाच अंक आणि मोबाईल नंबर टाकावा लागतो. शेवटी ऑनलाइन पेमेंट केल्यानंतर नोंदणी पूर्ण होते आणि फिटमेंटसाठी तारीख व वेळ दिली जाते. त्या दिवशी वाहन घेऊन निश्चित केंद्रावर जाऊन नंबरप्लेट बसवून घ्यावी लागते. दुचाकीसाठी सुमारे 450 रुपये तर चारचाकीसाठी सुमारे 745 रुपये शुल्क आकारले जाते.
18 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या कारवाई मोहिमेमुळे वाहनधारकांनी कोणतीही जोखीम न पत्करता तात्काळ HSRP बसवून घ्यावी, अन्यथा दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. प्रशासनाने दिलेली अंतिम संधी संपली असून आता नियमांची काटेकोर अंमलबजावणी होणार आहे.
Follow us on our social media handles:
Instagram – https://www.instagram.com/newsdotz/
YouTube – https://www.youtube.com/@NewsDotz
Facebook – https://www.facebook.com/NewsDotz/
Twitter – https://x.com/NewsDotz
Also Read: Pune’s Latest Information