मंत्रालयात बनावट नोकरीच्या मुलाखती; नागपूरच्या भामट्याने 1.60 कोटींची फसवणूक

0
मंत्रालयात बनावट नोकरीच्या मुलाखती; नागपूरच्या भामट्याने 1.60 कोटींची फसवणूक

मंत्रालयात बनावट नोकरीच्या मुलाखती; नागपूरच्या भामट्याने 1.60 कोटींची फसवणूक

नागपूरच्या भामट्याने बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीचे आमिष दाखवून मंत्रालयात बनावट मुलाखती घेतल्या. तब्बल 1.60 कोटींची फसवणूक उघडकीस आली असून पोलिसांनी मुख्य आरोपी लॉरेन्स हेनरीला अटक केली आहे.

सायली मेमाणे

पुणे १३ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्रात नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना धक्का बसावा असा प्रकार नागपुरात उघडकीस आला आहे. नागपूरच्या एका भामट्याने सरकारी नोकरीच्या आमिषाने तब्बल 1 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे या भामट्याने मंत्रालयासारख्या कडेकोट सुरक्षाव्यवस्थेच्या ठिकाणीच बनावट मुलाखती आयोजित केल्या. या घटनेनंतर केवळ बेरोजगार तरुणच नव्हे तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणाच हादरली आहे.

2019 ते 2022 या कालावधीत आरोपीने कनिष्ठ लिपिक पदाच्या नोकरीचे आमिष दाखवून अनेकांना आपल्या जाळ्यात ओढले. त्यासाठी त्यांनी मुंबईच्या मंत्रालयातच बनावट मुलाखती घेतल्या आणि विश्वास संपादन केला. इच्छुक उमेदवारांना बनावट मेडिकलसाठी जे.जे. रुग्णालयात नेले जात असल्याचेही पोलिस तपासात उघड झाले आहे. आतापर्यंतच्या चौकशीत ही फसवणूक 1.60 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली असून, ही रक्कम आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या प्रकरणी नागपूर पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने कारवाई करत मुख्य आरोपी लॉरेन्स हेनरी वय 45 याला मुंबईतून अटक केली आहे. त्याची पत्नी शिल्पा हेनरी उर्फ शिल्पा उदापुरे, वसंतकुमार उर्फ वसंतराव उदापुरे, विजय पटणकर, नितीन साठे, सचिन डोलास आणि एक चतुर्थश्रेणी कर्मचारी हे आरोपी या प्रकरणात सामील असल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी लॉरेन्सला अटक केली असली तरी इतर आरोपी अद्याप फरार आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे.

या टोळीने प्लेसमेंट एजंट आणि सरकारी अधिकारी म्हणून वावर घेतला होता. बेरोजगार तरुणांना सरकारी नोकरीच्या बनावट जाहिराती दाखवून त्यांनी विश्वास बसवला. मुख्य आरोपी लॉरेन्स हेनरी आणि त्याची पत्नी शिल्पा यांनी ‘बंटी-बबली’ जोडीप्रमाणे काम करत नागपूरमध्ये एक जॉब कन्सल्टन्सी फर्मही सुरू केली होती. या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांनी नोकरीसाठी इच्छुक तरुणांना संपर्क साधला आणि त्यांना मंत्रालयात मुलाखतीसाठी नेले. मंत्रालयात घेतलेल्या या मुलाखतींमुळे उमेदवारांचा विश्वास अधिक दृढ झाला आणि त्यांनी पैसे मोजले.

या संपूर्ण प्रकरणामुळे मंत्रालयाच्या सुरक्षेवर आणि प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ज्या ठिकाणी मंत्र्यांच्या बैठका आणि राज्यातील महत्त्वाचे निर्णय घेतले जातात, त्या ठिकाणी अशा प्रकारे फसवणुकीसाठी बनावट मुलाखती घेण्यात आल्या, ही बाब चिंताजनक आहे. पोलिसांनी याप्रकरणी उच्चस्तरीय तपास सुरू केला आहे.

बेरोजगारीच्या छायेत अनेक तरुण सरकारी नोकरीसाठी धडपडत असतात. या इच्छेचा गैरफायदा घेत आरोपींनी त्यांना लाखो रुपयांचा गंडा घातला. पोलिसांच्या मते आतापर्यंत सुमारे शंभरहून अधिक जणांची फसवणूक झाल्याची शक्यता आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपींविरुद्ध कठोर कारवाई होणार आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed