IAS आणि IPS अधिकाऱ्यांची ट्रेनिंग कुठे होते? जाणून घ्या या खास ठिकाणाबद्दल सविस्तर माहिती
IAS आणि IPS अधिकाऱ्यांची ट्रेनिंग कुठे होते?
UPSC पास झाल्यावर IAS आणि IPS अधिकाऱ्यांचे ट्रेनिंग कुठे होते, ते कसे असते, किती खर्च येतो याबाबत संपूर्ण माहिती येथे मिळवा.
सायली मेमाणे
पुणे ८ जुलै २०२५ : UPSC ही परीक्षा भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या परीक्षा मानल्या जातात. यामध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची संख्या लाखोमध्ये एक असते. आयएएस (IAS), आयपीएस (IPS) आणि आयएफएस (IFS) यांसारख्या केंद्रीय सेवांमध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या क्रमांकावरून सेवा दिली जाते आणि त्यानंतर सुरु होते त्यांची प्रशिक्षणाची रोमांचक आणि महत्त्वपूर्ण वाटचाल. भारत सरकारच्या विविध प्रशासकीय सेवा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ही प्रशिक्षण प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची ठरते.
IAS अधिकाऱ्यांचं प्रारंभिक प्रशिक्षण लाल बहादुर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन (LBSNAA), मसूरी येथे होते. हे संस्थान देशातील सर्वात प्रतिष्ठित प्रशिक्षण केंद्र मानले जाते. या ठिकाणी सर्व ऑल इंडिया सर्व्हिसेस आणि ग्रुप-A सेवेतील उमेदवारांना तीन महिन्यांचा फाउंडेशन कोर्स दिला जातो. या कोर्समध्ये प्रशासनिक ज्ञान, वर्तनशास्त्र, नेतृत्वगुण, सहकार्य, संवेदनशीलता आणि नागरी मूल्ये यांचा समावेश असतो. या टप्प्यावर IAS, IPS, IFS अशा विविध शाखांमधील उमेदवार एकत्रितपणे प्रशिक्षण घेतात. हे दिवस त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
यानंतर IAS उमेदवारांचं विशेष प्रशिक्षण LBSNAA मध्येच पुढे सुरू राहतं, तर IPS अधिकाऱ्यांचं पुढील प्रशिक्षण सरदार वल्लभभाई पटेल नॅशनल पोलिस अकॅडमी (SVPNPA), हैदराबाद येथे केलं जातं. IPS अधिकाऱ्यांना ११ महिन्यांचे सखोल प्रशिक्षण दिले जाते. यात शारीरिक प्रशिक्षण, पोलिसिंग स्किल्स, गुन्हे तपास, कायदे, सायबर क्राईम, दंगल नियंत्रण, मानवी अधिकार, कमांड व नेतृत्व अशा विविध बाबी शिकवल्या जातात. त्याचप्रमाणे रिअल-टाइम सिम्युलेशनद्वारे त्यांना प्रत्यक्ष परिस्थितीशी सामना करण्याचा सराव दिला जातो.
या प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थींना फारसा खर्च करावा लागत नाही. LBSNAA मध्ये एका अधिकाऱ्यासाठी सिंगल रूम भाडे दरमहा केवळ ₹350 इतके असते, तर डबल शेअरिंगसाठी ₹175 प्रतीजण शुल्क भरावे लागते. यामध्ये वीज आणि पाणी बिलसुद्धा समाविष्ट आहे. मेसचा खर्च सुमारे ₹10,000 पर्यंत असतो. या संस्थांमध्ये निवासासाठी आधुनिक हॉस्टेल्स, वाचनालय, इनडोअर स्पोर्ट्स, फिटनेस सेंटर, सायकल ट्रॅक, इंटरनेट सेवा, आरोग्य सुविधा इत्यादी अत्याधुनिक सुविधा मोफत दिल्या जातात.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर IAS अधिकाऱ्यांची पोस्टिंग त्याच्या कॅडरमध्ये केली जाते आणि IPS अधिकाऱ्यांना संबंधित राज्यांमध्ये उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून नेमणूक मिळते. हे प्रशिक्षण त्यांच्या कार्यक्षमतेचा पाया मजबूत करतं, जो त्यांच्या संपूर्ण कारकीर्दीत उपयोगी ठरतो.
UPSC ची परीक्षा फक्त शैक्षणिक कसोटी नव्हे, तर संपूर्ण व्यक्तिमत्वाची परीक्षाही असते. पण ती उत्तीर्ण झाल्यानंतर सुरु होणारे प्रशिक्षण हे अधिक सखोल, व्यावहारिक आणि प्रेरणादायी असते. IAS आणि IPS अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण हे केवळ सरकारी जबाबदारीसाठी नव्हे, तर देशासाठी नेतृत्व तयार करण्याची प्रक्रिया असते.