IND vs ENG: जय शाह यांची पोस्ट वादात; भारतीय संघाच्या कौतुकात मोहम्मद सिराजला डावललं?

0
जय शाह यांची पोस्ट वादात; भारतीय संघाच्या कौतुकात मोहम्मद सिराजला डावललं?

जय शाह यांची पोस्ट वादात; भारतीय संघाच्या कौतुकात मोहम्मद सिराजला डावललं?

IND vs ENG Test Series: जय शाह यांनी शुभमन गिल, आकाशदीप, जडेजा, आणि पंतचे कौतुक केलं; मात्र 9 विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराजला टाळल्यामुळे सोशल मीडियावर टीका

सायली मेमाणे

पुणे ७ जुलै २०२५ : भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने ३३६ धावांनी मोठा विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. या सामन्यादरम्यान शुभमन गिलच्या नेतृत्वात युवा खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. आकाशदीपच्या जबरदस्त गोलंदाजीने इंग्लंडला रोखण्यात मोठा हातभार लागला. या विजयानंतर संपूर्ण देशभरातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव झाला. आयसीसी अध्यक्ष आणि बीसीसीआय सचिव जय शाह यांनीही भारतीय संघाच्या विजयावर पोस्ट करत कौतुक केलं. मात्र, त्यांच्या या पोस्टवरून सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला आहे.

जय शाह यांनी आपल्या एक्स (पूर्वीचा ट्विटर) हँडलवर लिहिलं की, “भारतीय क्रिकेटची खोली आणि लवचिकता दर्शवणारा हा एक उत्कृष्ट कसोटी सामना होता. शुभमन गिलची २६९ आणि १६१ धावांची खेळी, आकाशदीपच्या १० विकेट्स, जडेजा आणि पंतने दिलेलं योगदान, हे सर्व संघाच्या विजयासाठी महत्त्वाचं ठरलं.” मात्र, या यादीत ९ विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद सिराज याचं नाव नव्हतं. सिराजने या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजीवर दबाव टाकत निर्णायक भूमिका बजावली होती. शिवाय, त्याने दोन महत्वाचे झेल देखील घेतले.

जय शाह यांच्याकडून सिराजचे नाव न घेतल्यामुळे अनेक चाहते संतप्त झाले. सोशल मीडियावर जय शाह यांच्यावर पक्षपातीपणाचा आरोप करत टीका केली जात आहे. “९ विकेट्स घेणारा गोलंदाज विसरला कसा जाऊ शकतो?” असा सवाल अनेकांनी विचारला. काहींनी ही गोष्ट हेतुपुरस्सर असल्याचा संशयही व्यक्त केला आहे. क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचं वातावरण असून, जय शाह यांना सिराजसाठी माफीनामा करावा, अशी मागणी काहींनी केली आहे.

दरम्यान, मालिकेतील पुढचा सामना १० जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. भारत पहिल्या सामन्यात पराभूत झाला होता, पण दुसऱ्या सामन्यात मिळालेल्या ऐतिहासिक विजयामुळे आत्मविश्वास उंचावला आहे. तिसऱ्या सामन्यात दोन्ही संघ विजयासाठी पूर्ण ताकदीने उतरतील. सिराजसारख्या गोलंदाजांची भूमिका पुन्हा निर्णायक ठरू शकते.

या संपूर्ण घडामोडीतून हे स्पष्ट होतं की भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूंचं यश एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. एका खेळाडूचं योगदान विसरणं किंवा दुर्लक्ष करणं चाहत्यांना मान्य नाही, हे जय शाह यांना सोशल मीडियावरून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed