India vs Pakistan Women’s ODI 2025: हरमनप्रीत कौरची नशरा संधूशी बाचाबाची व्हायरल
हरमनप्रीत कौरची नशरा संधूशी बाचाबाची
ICC महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 मध्ये भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यात हरमनप्रीत कौर आणि नशरा संधू यांच्यातील बाचाबाची सोशल मीडियावर व्हायरल. टीम इंडियाने पाकिस्तानला 88 धावांनी पराभव केला.
सायली मेमाणे
पुणे ६ ऑक्टोबर २०२५ : आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 खूप मनोरंजक ठरत आहे. भारताच्या संघाने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात कमालीची कामगिरी केली असून भारतीय खेळाडूंवर सर्वत्र कौतुक होत आहे. भारताची कर्णधार हरमनप्रीत कौर ही तिच्या रागीट स्वभावासाठी तसेच सामन्यातील निर्णायक खेळीसाठी ओळखली जाते.
५ ऑक्टोबर रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ८८ धावांनी पराभव केला आणि स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवला. या सामन्यात हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची गोलंदाज नशरा संधू यांच्यात एक छोटीशी बाचाबाची झाली, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
डावातील २२ व्या षटकात नशरा संधूने टाकलेल्या शेवटच्या चेंडूनंतर रागाने हरमनप्रीत कौरकडे पाहिले. भारतीय कर्णधाराने या रागाचा प्रत्युत्तर देताना नशराबद्दल टिप्पणी केली आणि तिच्या शैलीत उत्तर दिले. ही विनोदी व थोडी तणावपूर्ण घटना चाहत्यांसाठी मजेशीर ठरली असून व्हायरल झाली आहे.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. ५० षटकांत टीम इंडियाने २४७ धावा केल्या. हरलीन देओलने ४६ धावा केल्या, रिचा घोषने ३५ तर जेमिमाने ३२ धावा काढल्या. पाकिस्तानकडून डायना बेगने १० षटकांत ६९ धावा देऊन सर्वाधिक विकेट घेतल्या.
पाकिस्तानने दुसऱ्या डावात ४३ षटकांत १५९ धावांवर गारद झाला. सिद्रा अमीनने सर्वाधिक ८१ धावा केल्या, तर नतालिया परवेझने ३३ धावा केल्या, परंतु संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. टीम इंडियाकडून क्रांती गौर आणि दीप्ती शर्माने प्रत्येकी तीन विकेट घेतल्या.
या सामन्यातील बाचाबाची आणि हरमनप्रीत कौरची खेळी चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ भारतीय चाहत्यांना खूप आवडला असून दोन्ही खेळाडूंच्या सामन्यातील प्रतिस्पर्धी भावना प्रदर्शित करणारा ठरला आहे.