Team India Good News: मॅचविनर अमनज्योत कौर वर्ल्ड कपमध्ये परतण्यासाठी सज्ज
Team India Good News: मॅचविनर अमनज्योत कौर वर्ल्ड कपमध्ये परतण्यासाठी सज्ज
आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 मध्ये भारत vs दक्षिण आफ्रिका सामना 9 ऑक्टोबरला; मॅचविनर अमनज्योत कौर दुखापतीनंतर कमबॅकसाठी सज्ज, टीम इंडियाची बॅटिंग मजबूत
सायली मेमाणे
पुणे ९ ऑक्टोबर २०२५ : आयसीसी वूमन्स वनडे वर्ल्ड कप 2025 स्पर्धेत टीम इंडियासाठी गूड न्यूज आली आहे. भारतीय संघ गुरुवारी 9 ऑक्टोबरला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपला तिसरा सामना खेळणार असून, या सामन्यातून मॅचविनर अमनज्योत कौर कमबॅक करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत मिळाले आहेत. सामना आंध्र प्रदेशमधील विशाखापट्टणम येथील एसीए व्हीडीसीए स्टेडियममध्ये होणार आहे. भारताने या स्पर्धेत आपले पहिले दोन सामने जिंकले आहेत आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयी हॅटट्रिक करण्याची संधी त्यांच्यासमोर आहे.
अमनज्योत कौर, जी या स्पर्धेत टीम इंडियाला विजयी सुरुवात करून दिली होती, आता पुन्हा प्लेइंग ईलेव्हनमध्ये परत येण्यास सज्ज आहे. पाकिस्तानविरुद्ध 5 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात आजारपणामुळे तिला खेळता आले नव्हते. अमनज्योतच्या जागी रेणुका सिंह ठाकुरला संधी देण्यात आली होती. परंतु आता अमनज्योत कौर पूर्णपणे बरी असून टीममध्ये सामील होण्याची तयारी सुरू आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला 8 ऑक्टोबरला पत्रकार परिषदेत टीम इंडियाची बॅट्समन जेमीमाह रॉड्रिग्सने अमनज्योतच्या कमबॅकचे संकेत दिले. जेमीमाहने सांगितले, “आमची सलामी भागीदारी चांगली चालू आहे. प्रतिका रावल आणि स्मृती मंधाना या जोडीने १ हजार पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. आमच्या बॅटिंगमध्ये खोली आहे आणि अमनज्योत, दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. अमनज्योत आता पूर्णपणे बरी आहे आणि टीममध्ये सामील होईल.”
अमनज्योतने वूमन्स वर्ल्ड कप स्पर्धेत चाबूक कामगिरी केली होती. 30 सप्टेंबरला श्रीलंकेविरुद्ध खेळलेल्या सामन्यात ती निर्णायक क्षणी सामन्यातील मोर्चा बदलणारी ठरली होती. 56 चेंडूत 57 धावा करत तिने बॅटिंगमध्ये आपला जलवा दाखवला होता. त्यानंतर बॉलिंगमध्येही तिने योगदान दिले, 37 धावांच्या मोबदल्यात 1 विकेट घेतली.
आता अमनज्योत कौर पुन्हा संपूर्ण फिट असून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामन्यात प्लेइंग ईलेव्हनमध्ये समाविष्ट होणार का, हे सर्व चाहते आणि क्रिकेट रसिकांसाठी उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. भारताने सलग दोन सामने जिंकले असून टीम इंडियाची बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही विभाग मजबूत आहेत. अमनज्योतच्या कमबॅकमुळे संघाची ताकद आणखी वाढणार आहे.
या सामन्यात विजय मिळवणे टीम इंडियासाठी फक्त हॅटट्रिकच नव्हे तर आत्मविश्वासाचे मोठे पाऊल ठरणार आहे. भारतीय चाहत्यांच्या मनात अमनज्योत कौरच्या कमबॅकविषयी उत्सुकता आहे, आणि तिच्या उपस्थितीमुळे संघाच्या कामगिरीमध्ये नवीन ऊर्जा निर्माण होईल.