IPL 2026 Mini Auction: 19 व्या हंगामासाठी ऑक्शन तारीख आणि अपडेट्स
IPL 2026 Mini Auction: 19 व्या हंगामासाठी ऑक्शन तारीख आणि अपडेट्स
IPL 2026 साठी मिनी ऑक्शन डिसेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता. फ्रँचायजींसाठी करारमुक्त खेळाडूंची अंतिम तारीख 15 नोव्हेंबर; जाणून घ्या सविस्तर अपडेट.
सायली मेमाणे
पुणे १० ऑक्टोबर २०२५ : भारतीय क्रिकेट वर्तुळातून IPL 2026 च्या चाहत्यांसाठी मोठी आणि उत्साही बातमी समोर आली आहे. आयपीएलच्या 19 व्या हंगामासाठी मिनी ऑक्शनची तारीख क्रिकबझच्या अहवालानुसार डिसेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या ऑक्शनसाठी फ्रँचायजींसाठीही महत्त्वाची अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
आयपीएलच्या 18 व्या हंगामातील अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्सला पराभूत करून 17 वर्षांची प्रतीक्षा संपवत आयपीएल ट्रॉफीवर आपले नाव कोरले. त्यानंतर चाहत्यांना 19 व्या हंगामाची उत्सुकता लागली असून, आता मिनी ऑक्शनबाबतची प्रतीक्षा जोर धरली आहे.
फ्रँचायजींसाठी महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणते खेळाडू कायम ठेवायचे आणि कोणते करारमुक्त करायचे हे ठरविणे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या ऑक्शनपूर्वी प्रत्येक फ्रँचायजीला बीसीसीआयकडे करारमुक्त खेळाडूंची नावे द्यावी लागतील आणि यासाठी अंतिम मुदत 15 नोव्हेंबर ठरवण्यात आली आहे. राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्सला वगळता इतर संघ करारमुक्त खेळाडूंची नावे फार कमी बदल करतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
मिनी ऑक्शनचे ठिकाणही उत्सुकतेचा विषय आहे. मागील दोन हंगामांसाठी ऑक्शन परदेशात आयोजित करण्यात आले होते. IPL 17 व्या हंगामासाठी ऑक्शन दुबईत पार पडले होते, तर 18 व्या हंगामाच्या मेगा ऑक्शनचे आयोजन जेद्दाहमध्ये केले गेले होते. मात्र, सूत्रांच्या माहितीनुसार यंदा ऑक्शन भारतातच होऊ शकते. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती जाहीर केलेली नाही.
ऑक्शनमध्ये खेळाडूंचा सरळ वाटप आणि फ्रँचायजींसाठी स्ट्रॅटेजिक निर्णय हे प्रत्येक संघासाठी महत्वाचे ठरणार आहेत. फ्रँचायजींसाठी योग्य खेळाडूंचा पर्याय निवडणे आणि संघात संतुलन राखणे हा यशस्वी हंगामासाठी निर्णायक घटक ठरेल. आयपीएलच्या चाहत्यांसाठीही ही एक उत्साही वेळ आहे, कारण मिनी ऑक्शनमध्ये अनेक नवीन खेळाडूंची एंट्री होऊ शकते आणि अनेक स्टार खेळाडू नवीन संघांसोबत मैदानात उतरू शकतात.
IPL 2026 च्या हंगामासाठी ही तयारी, करारमुक्त खेळाडूंची यादी, फ्रँचायजींची रणनीती आणि ऑक्शनची तारीख या सर्व गोष्टी चाहत्यांसाठी रोमांचक ठरणार आहेत. डिसेंबरच्या दुसऱ्या ते तिसऱ्या आठवड्यात होणारे मिनी ऑक्शन आणि त्याआधीची 15 नोव्हेंबरची अंतिम मुदत, या दोन्ही घटक हंगामासाठी संघांची आखणी आणि प्रतिस्पर्ध्यांसमोर रणनीती ठरविण्यास महत्त्वाची ठरतील.