Jeevansathi Fraud in Pimpri-Chinchwad: ‘प्राध्यापक’ बनून लाखोंची फसवणूक; महिला पोलीस अधिकाऱ्यासह अनेक महिलांची दिशाभूल
‘प्राध्यापक’ बनून लाखोंची फसवणूक; महिला पोलीस अधिकाऱ्यासह अनेक महिलांची दिशाभूल
पिंपरी-चिंचवडमध्ये जीवनसाथी संकेतस्थळावर प्राध्यापक असल्याचे भासवून युवकाकडून लाखोंची फसवणूक. महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला 20 लाखांचा गंडा. आरोपीवर कारवाई सुरू.
सायली मेमाणे
१४ नोव्हेंबर २०२५ : पिंपरी-चिंचवडमध्ये विवाह संकेतस्थळावर प्राध्यापक असल्याची खोटी बतावणी करून अनेक महिलांची फसवणूक करणारा एक मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. ‘जीवनसाथी’ या लोकप्रिय विवाह संकेतस्थळावर बनावट प्रोफाइल तयार करून युवकाने महिलांचा विश्वास संपादन केला आणि लाखो रुपयांची फसवणूक केली. या प्रकारात एका महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबाला 20 लाखांचा गंडा घातल्याचे स्पष्ट झाले असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आरोपीचे नाव महेश वडार असून तो मूळचा कोल्हापूरचा असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. वडार स्वतःला एका नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक असल्याचे भासवत होता. त्याने विद्यार्थ्यांना शिकवतानाचे फोटो, प्राचार्याच्या केबिनमध्ये बसलेले फोटो आणि शैक्षणिक कागदपत्रांची बनावट प्रत दाखवून स्वतःची ‘खोटी प्रतिष्ठा’ निर्माण केली होती. या फोटोंचा उपयोग करून त्याने अनेक महिलांना आणि त्यांच्या कुटुंबियांना चुकीच्या समजुतीत ठेवले.
फसवणुकीचा प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचला. जीवनसाथीवरून संपर्क साधत आरोपीने तिच्या आई-वडिलांशी नाते जुळवण्याचा बहाणा केला. त्यांना स्वतःला प्राध्यापक असल्याची खात्री पटवण्यासाठी बनावट फोटो दाखवले. काही दिवस सातत्याने संपर्क साधत त्याने विश्वास निर्माण केला आणि पदोन्नतीसाठी मोठी रक्कम लागणार असल्याचे सांगून 20 लाखांची मागणी केली. मुलीच्या भविष्याचा विचार करून पालकांनी त्याच्यावर विश्वास ठेवत रक्कम त्याला दिली. मात्र पैसे घेतल्यानंतर आरोपीने त्यांचा फोन नंबर ब्लॉक केला.
या प्रकरणाचा तपास करताना महाविद्यालयातील बोर्ड ऑफ डायरेक्टर्सशी संपर्क साधल्यावर आरोपी प्राचार्य नसून कोणत्याही पदावर नसल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा महिला पोलीस अधिकारी आणि तिच्या नातेवाईकांनी सापळा रचून आरोपीला पुण्यात बोलावले. त्याला महाविद्यालयात नेले असता त्याची खरी ओळख उघड झाली आणि त्याला रोखून ठेवण्यात आले. या प्रसंगानंतर आरोपीला काही व्यक्तींनी मारहाण केल्याचेही समोर आले आहे.
गुन्हा दाखल करण्यासाठी महिला अधिकारी रावेत पोलीस ठाण्यात गेली असता, पोलिसांनी तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. सुत्रांच्या माहितीनुसार, पोलिसांनी “तुमची मुलगी अविवाहित आहे, अशा तक्रारीमुळे भविष्यात तिच्या लग्नात अडचण येईल—प्रकरण आपसात मिटवा” असा सल्ला दिला असल्याची माहिती मिळाली. मात्र पोलिसांनी अधिकृतपणे असा कोणताही तक्रारदार ठाण्यात आला नसल्याचे सांगितले.
या आरोपीने याआधीही अनेक महिलांची फसवणूक केली असल्याचे उघड झाले आहे. पोलिस तक्रार लिहित असताना आरोपीच्या फोनवर दुसऱ्या महिला पीडितेचा व्हिडिओ कॉल आला. तक्रारदाराने तो कॉल उचलताच त्या महिलेने स्वतःच्या फसवणुकीची कहाणी सांगितली. यामुळे आरोपीकडून मोठ्या प्रमाणात महिलांची दिशाभूल होत असल्याचा आणखी पुरावा मिळाला.
हा प्रकार विवाह संकेतस्थळांवरील सुरक्षेबाबत मोठे प्रश्न निर्माण करतो. बनावट प्रोफाइल, खोट्या पदव्यांचा वापर, बनावट कागदपत्रे आणि फोटो यांच्या आधारे होत असलेल्या फसवणुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी संबंधित प्लॅटफॉर्मनी अधिक कडक पडताळणीची गरज आहे. तसेच पोलीस प्रशासनानेही पीडित महिलांकडून येणाऱ्या तक्रारींना गांभीर्याने हाताळण्याची आवश्यकता आहे.