जोगेश्वरी बिजनेस पार्क आग : मनसे शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची घेतली भेट; विकासकावर कारवाईची मागणी

0
मनसे शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची घेतली भेट; विकासकावर कारवाईची मागणी

मनसे शिष्टमंडळाने पालिका अधिकाऱ्यांची घेतली भेट; विकासकावर कारवाईची मागणी

जोगेश्वरी येथील बिजनेस पार्कला लागलेल्या भीषण आगीत 17 जण जखमी; मनसेने विकासकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.


सायली मेमाणे

पुणे २४ ऑक्टोबर २०२५ : मुंबई : जोगेश्वरी पश्चिमेकडील बेहरामबाग परिसरात स्थित जे एम एस बिझनेस पार्कमध्ये लागलेल्या भीषण आगीच्या घटनेनंतर मनसेकडून प्रशासनाविरोधात तीव्र भूमिका घेण्यात आली आहे. या आगीत तब्बल १७ जण गंभीर जखमी झाले असून, इमारतीतील अनधिकृत बांधकामामुळे आग अधिक भडकली असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज मुंबई महानगरपालिकेच्या के/पश्चिम प्रभागाचे सहाय्यक आयुक्त यांची भेट घेतली. शिष्टमंडळाने या इमारतीतील अनधिकृत मजले व नियमभंगावर तात्काळ एमआरटीपी कायद्यांतर्गत कारवाई करण्याची मागणी केली.

मनसेने ओशिवरा पोलिसांकडे विकासकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “ही घटना निष्काळजीपणा आणि अनधिकृत बांधकामाचा थेट परिणाम आहे. त्यामुळे जबाबदार विकासकांवर फौजदारी कारवाई केली पाहिजे.”

मनसे शिष्टमंडळाने सादर केलेल्या निवेदनात आगग्रस्तांना योग्य भरपाई देण्याची आणि भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी सुरक्षा तपासणीची मागणीही केली आहे. प्रभाग सहाय्यक आयुक्तांनी शिष्टमंडळाला अनधिकृत मजल्यांवर तोडक कारवाई करण्याचे आश्वासन दिले असून, एमआरटीपी कायद्यानुसार तपास सुरू असल्याचे सांगितले.

दरम्यान, आग लागल्यानंतर अग्निशमन दलाने मोठ्या प्रमाणावर मदतकार्य केले. इमारतीतील काही लोकांना शिडीच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. प्राथमिक तपासात शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर आले असून, इमारतीत फायर सेफ्टी सिस्टम अपुरी असल्याचेही लक्षात आले आहे.

स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या घटनेनंतर संताप व्यक्त केला असून, अशा अनधिकृत व्यावसायिक प्रकल्पांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. मनसेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, जर कारवाई न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल.

या प्रकरणावर आता मुंबई महानगरपालिकेचा तपास आणि कारवाई किती वेगाने होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Do-follow Links:
Instagram
YouTube
Facebook
Twitter

Also Read More About Pune

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *