कल्याणमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक बदल; महत्त्वाचे रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग
कल्याणमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक बदल; महत्त्वाचे रस्ते बंद, पाहा पर्यायी मार्ग
कल्याणमध्ये नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. काही रस्ते बंद राहणार आहेत आणि जड, मल्टिएक्सल वाहनांसाठी विशेष पर्यायी मार्ग निश्चित केले आहेत.
सायली मेमाणे
पुणे १९ सप्टेंबर २०२५ : कल्याण शहरात नवरात्रोत्सव आणि दसरा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान दुर्गामाता मंदिर, दुर्गाडी किल्ला आणि कल्याण पश्चिम येथे उत्सव साजरे होणार आहेत. या काळात मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय रस्त्यावर येईल, त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी विशेष उपाययोजना केली आहे.
पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली, ठाणे शहरातील वाहतूक विभागाने मोटार वाहन कायदा कलम ११५ आणि ११६ (१) (अ) (ब) च्या अधिकाराचा वापर करून महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. यात काही रस्ते बंद ठेवण्याबाबत आणि पर्यायी मार्ग निश्चित करण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
सदर अधिसूचनेनुसार, नवी मुंबई, पनवेल आणि महापे पाइपलाईन मार्गे कल्याण नाका येथून पत्रीपूल मार्गे शहरात प्रवेश करणाऱ्या सर्व ६ चाकी, जड, अवजड आणि मल्टिएक्सल वाहनांसाठी प्रवेश बंद राहणार आहे. या वाहनांसाठी पर्यायी मार्ग म्हणून मुद्रा बायपास मार्गे खारेगाव टोलनाका आणि नाशिक-मुंबई महामार्ग मार्गदर्शित केला आहे.
तळोजा बायपास मार्गे खोणी निसर्ग ढाबा कडून शहरात येणाऱ्या जड वाहनांसाठी देखील प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. पर्यायी मार्गाद्वारे बदलापूर, अंबरनाथ, काटई बदलापूर चौक आणि लोढ़ा पलावा मार्गे इच्छित स्थळी पोहोचता येईल.
नेवाळी नाका (विठ्ठलवाडी वाहतूक उप विभाग) कडून मलग रोडने चक्कीनाका येणाऱ्या जड वाहनांसाठी देखील प्रवेश बंद आहे. यासाठी बदलापूर अंबरनाथ हायवे मार्ग पर्यायी ठेवण्यात आला आहे. तसेच श्रीराम चौक कडून कोळसेवाडी वाहतूक उप विभाग हद्दीतील जड वाहनांसाठी प्रवेश बंद असून, पर्यायी मार्ग उल्हासनगर, शहाड आणि अंबरनाथ मार्गे दिला आहे.
शहाड प्रेम ऑटो दुर्गामाता चौक कोनगाव, भिवंडी कडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांसाठी आधारवाडी चौक येथे प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. पर्यायी मार्गाद्वारे वाहने गंधारी ब्रिज आणि बापगाव सोनाळे मार्गे इच्छित स्थळी जाऊ शकतील.
तसेच रांजनोली नाका (कोनगाव वाहतूक उप विभाग) कडून कोनगाव मार्गे कल्याण दिशेने येणाऱ्या सर्व जड वाहनांसाठी प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. या बदलामुळे नवरात्रोत्सवाच्या काळात शहरातील वाहतूक सुरळीत राहण्यास मदत होईल.
कल्याण पोलीसांनी नागरिकांना आणि वाहनचालकांना सुचना दिल्या आहेत की, उत्सवाच्या काळात या रस्त्यांवर वाहन चालवताना पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. तसेच गर्दीच्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे.
यंदा नवरात्रोत्सव दरम्यान होणारी ही वाहतूक व्यवस्थापनाची उपाययोजना शहरातील नागरिकांसाठी आणि भाविकांसाठी सुरक्षित आणि सुसंगत प्रवास सुनिश्चित करेल.