पुण्यात खडकवासला धरणातून विसर्ग वाढणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
पुण्यात खडकवासला धरणातून विसर्ग वाढणार; नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
घाटमाथ्यावर झालेल्या मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून 4697 क्यूसेक विसर्ग सुरू. पाणीप्रवाह वाढण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा.
सायली मेमाणे
पुणे १५ सप्टेंबर २०२५ : पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणातील पाणीपातळी वेगाने वाढत आहे. यामुळे खडकवासला धरण प्रशासनाने पाण्याचा विसर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. आज सकाळी ७ वाजल्यापासून धरणातून ४६९७ क्यूसेक इतका विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे. वाढत्या पावसाचा विचार करता हा विसर्ग आणखी वाढवण्याची शक्यता नाकारता येत नाही.
धरणातून होणाऱ्या विसर्गामुळे मुठा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने सर्वांना अनावश्यकपणे नदीकाठावर न जाण्याचे आवाहन केले आहे. तसेच पाणीप्रवाह वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्कालीन यंत्रणांना सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुणे शहर व परिसरात मागील काही दिवसांपासून अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. मात्र, गेल्या २४ तासांत घाटमाथ्यावर मुसळधार पावसामुळे धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली आहे. खडकवासला धरणासोबतच वरसगाव, पानशेत आणि टेमघर धरणांमधील पाणीपातळ्याही लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत. त्यामुळे मुठा नदीकाठच्या गावांमध्ये प्रशासनाने विशेष दक्षता घेण्यास सुरुवात केली आहे.
नदीकाठच्या गावांमधील नागरिकांनी सुरक्षिततेसाठी प्रशासनाशी समन्वय साधावा आणि सतत अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. सोशल मीडियावर अपप्रचार अथवा चुकीची माहिती शेअर करू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
यापूर्वी अनेक वेळा मुसळधार पावसामुळे अचानक विसर्ग वाढल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने अगोदरच तयारीचा इशारा दिला आहे. जलसंपदा विभागाने सांगितले की, पावसाचे प्रमाण लक्षात घेऊन परिस्थितीचे सतत परीक्षण केले जात आहे आणि त्यानुसार विसर्ग नियंत्रित करण्यात येईल.
हवामान विभागाने पुढील काही दिवसांत कोकण व मध्य महाराष्ट्रासह पुणे जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे नदीकाठच्या भागात पुरस्थिती उद्भवू नये म्हणून नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
ही परिस्थिती लक्षात घेता पुणेकरांनी सावधगिरी बाळगणे अत्यंत गरजेचे आहे. सुरक्षिततेसाठी योग्य पावले उचलल्यास संभाव्य धोका टाळता येऊ शकतो.