पुण्यानंतर कोल्हापुरात गँगवॉर; सराईत गुन्हेगार महेंद्र राखची मध्यरात्री हत्या, CCTV व्हिडिओ व्हायरल
पुण्यानंतर कोल्हापुरात गँगवॉर; सराईत गुन्हेगार महेंद्र राखची मध्यरात्री हत्या
कोल्हापुरातील फुलेवाडीत गँगवॉरमधून सराईत गुन्हेगार महेंद्र राखची तलवार आणि रॉडने निर्घृण हत्या. हत्येचा CCTV व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुण्यातील आयुष कोमकर हत्येनंतर राज्यात खळबळ.
सायली मेमाणे
पुणे १३ सप्टेंबर २०२५ : महाराष्ट्रात गँगवॉरच्या घटना दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. नुकत्याच पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांडाने राज्य हादरवले होते. आता त्याच धर्तीवर कोल्हापुरात देखील सराईत गुन्हेगाराची निर्घृण हत्या झाली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कोल्हापुरातील फुलेवाडी परिसरात शुक्रवारी मध्यरात्री हा प्रकार घडला. हत्या झालेल्या तरुणाचे नाव महेंद्र राख असून तो सराईत गुन्हेगार म्हणून ओळखला जात होता. काही दिवसांपूर्वीच त्याच्यावर हद्दपारीची कारवाई झाली होती. शिक्षा भोगून महेंद्र राख पुन्हा कोल्हापुरात परतला होता. मात्र परत आल्यानंतर काही तासातच टोळीने त्याच्यावर जीवघेणा हल्ला केला.
हल्लेखोरांनी तलवार, एडका, लोखंडी रॉड आणि काठ्यांचा वापर करून महेंद्र राखवर एकामागोमाग वार केले. या हल्ल्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी झालेला प्रकार इतका भयंकर होता की स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र हल्लेखोर अधिक आक्रमक असल्याने कुणालाही धाडस झाले नाही. एका महिलेशी लग्न करण्याच्या कारणातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.
या घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. संबंधित व्हिडिओमध्ये सात ते आठ हल्लेखोर महेंद्र राखचा पाठलाग करताना दिसत आहेत. तो स्वतःचा जीव वाचवण्यासाठी एका घरात घुसण्याचा प्रयत्न करत होता, मात्र हल्लेखोरांनी त्याला ओढून बाहेर आणले आणि निर्दयपणे मारहाण केली. धारदार शस्त्रांनी केलेल्या वारांमुळे काही क्षणांतच त्याचा जीव गेला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
पुण्यातील आयुष कोमकर हत्याकांडानंतर हा प्रकार घडल्याने राज्यभरात गुन्हेगारी टोळ्यांबाबत चिंता वाढली आहे. पुण्यात माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष याची गोळ्या झाडून हत्या झाली होती. आरोपींनी पाळत ठेवून त्याला लक्ष्य केले होते. या घटनेने महाराष्ट्राला हादरवून सोडले होते. ती घटना ताजी असतानाच कोल्हापुरात आणखी एक गँगवॉरमधील हत्या घडल्याने नागरिक आणि पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.
स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून आरोपींचा शोध सुरू आहे. गँगवॉरच्या या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा वादळ उठले आहे. सतत घडणाऱ्या खुनांच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिस प्रशासनाला गुन्हेगारी टोळ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
या हत्येचा तपास सुरू असून पोलिसांकडून सर्व CCTV फुटेज तपासले जात आहेत. आरोपींना लवकरात लवकर गजाआड करण्यासाठी विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. कोल्हापुरातील या घटनेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा गँगवॉरचा प्रश्न गंभीर स्वरूपात पुढे आला आहे.