Kolhapur News: जिल्हा परिषद शाळेत ‘नो मोअर बॅक बेंचर्स’ पद्धत; केरळ पॅटर्नवर नवी बैठक व्यवस्था
जिल्हा परिषद शाळेत 'नो मोअर बॅक बेंचर्स' पद्धत; केरळ पॅटर्नवर नवी बैठक व्यवस्था
Kolhapur ZP Schools: कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये केरळ पॅटर्नवर आधारित ‘नो मोअर बॅक बेंचर्स’ बैठक व्यवस्था सुरू. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी ‘मिशन ज्ञान कवच’ उपक्रमाची अंमलबजावणी.
सायली मेमाणे
पुणे १७ सप्टेंबर २०२५ : कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत मोठा बदल करण्यात आला आहे. केरळ राज्यातील ‘नो मोअर बॅक बेंचर्स’ या संकल्पनेच्या धर्तीवर जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये यू-आकारात बैठक व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यामुळे वर्गात कोणालाही मागच्या बाकावर बसावे लागणार नाही. या उपक्रमाला ‘मिशन ज्ञान कवच’ असे नाव देण्यात आले असून राज्यात ही पद्धत अंमलात आणणारा कोल्हापूर हा पहिला जिल्हा ठरला आहे.
पूर्वी शाळांमध्ये विद्यार्थी एकामागोमाग बसलेले दिसत असत. यामुळे मागच्या बाकावर बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास कमी होतो आणि शिक्षकांचे लक्ष मुख्यत्वे पुढे बसणाऱ्यांकडेच जास्त जात असे. या समस्येवर उपाय म्हणून जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने नवीन बैठक व्यवस्था लागू केली आहे. गोलाकार पद्धतीमुळे प्रत्येक विद्यार्थ्याशी शिक्षकांचा थेट संवाद साधला जात आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सांगितले की, ही बैठक पद्धती विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वास वृद्धीबरोबरच शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा घडवेल. कोल्हापुरातील अनेक शाळांमध्ये या पद्धतीचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. विद्यार्थ्यांना शिक्षकांशी संवाद साधणे सोपे झाले असून वर्गात सहभाग वाढला आहे.
उचगाव जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय लोंढे यांनी सांगितले की, “पूर्वी काही विद्यार्थी मुद्दाम मागे बसायचे आणि संवाद टाळायचे. पण आता या पद्धतीमुळे प्रत्येक मुलाकडे लक्ष जात आहे. विद्यार्थ्यांचा आणि शिक्षकांचा दुरावा कमी झाला आहे. जास्त पटसंख्या असलेल्या वर्गात थोडी अडचण येते, पण तरीही ही पद्धत स्वागतार्ह आहे.”
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी आणि प्रत्येकाला समान संधी मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्हा परिषदेचा हा उपक्रम पालक व शिक्षकांकडूनही कौतुकास्पद ठरत आहे. केरळ पॅटर्नवर आधारित ‘नो मोअर बॅक बेंचर्स’ ही बैठक व्यवस्था आता कोल्हापुरातील जिल्हा परिषद शाळांमध्ये चर्चेचा विषय ठरली आहे.