Laxman Hake Attack Protest: नीरा येथे ओबीसी समाजाचा कडकडीत बंद
Laxman Hake Attack Protest: नीरा येथे ओबीसी समाजाचा कडकडीत बंद
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ नीरा बाजारपेठ आज कडकडीत बंद ठेवण्यात आली. ओबीसी बांधवांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर सभा घेऊन निषेध नोंदवला.
सायली मेमाणे
पुणे २ सप्टेंबर २०२५ : पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील नीरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी नीरा बाजारपेठ कडकडीत बंद ठेवण्यात आली. या घटनेनंतर परिसरातील ओबीसी बांधव आणि व्यापारी संतप्त झाले असून त्यांनी एकत्र येऊन हाके यांच्यावरील हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला. या बंदमध्ये सर्व व्यापाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि समाजाच्या हाकेला प्रतिसाद दिला.
घटना अशी की, रविवारी लक्ष्मण हाके पुण्याहून लोणंदकडे जात असताना नीरा येथे एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी काही मराठा तरुणांनी हाके यांना आमच्या समाजाबद्दल तुम्ही का बोलता, असा सवाल केला आणि आरक्षणाबाबत चर्चा सुरू केली. यावेळी हाके आणि तरुणांमध्ये शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हाके यांनी रस्त्यावर ठिय्या मांडत आक्रमक पवित्रा घेतला. पोलिसांनी मध्यस्थी करून प्रकरण मिटवले. मात्र, लोणंद येथे गेल्यावर हाके यांनी आपल्यावर जीवघेना हल्ला झाल्याचा दावा केला.
या दाव्यानंतर ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष पसरला. हाके यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी रात्रीच नीरा बंदची हाक देण्यात आली. ज्या तरुणांनी हाके यांना अडवून प्रश्न विचारले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ओबीसी समाजाच्यावतीने जेजुरी पोलिसांकडे करण्यात आली. त्यानुसार सोमवारी सकाळपासून नीरा बाजारपेठ पूर्णपणे बंद ठेवण्यात आली.
सकाळी दहा वाजता ओबीसी बांधव ग्रामपंचायत कार्यालयासमोर जमले आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहून हाके यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. यावेळी लक्ष्मण हाके यांनी फोनवरून उपस्थितांशी संवाद साधला. त्यांनी ओबीसी समाजाच्या आरक्षणावर कोणताही आघात होऊ देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला तसेच बांधवांना शांतता राखण्याचे आवाहन केले.
सभा आणि निषेध कार्यक्रमात अनेक स्थानिक मान्यवर उपस्थित होते. दादासाहेब गायकवाड, शंकरराव मर्दाने, गणपत लकडे, शितल चोरमले, विजय धायगुडे, प्रकाश कदम, राजेंद्र लकडे, ॲड. आदेश गिरमे, बबन गोफणे, संदिप धायगुडे, गणेश फरांदे, दयानंद चव्हाण, राजेंद्र बरकडे, अनिल चव्हाण, राजेश काकडे, सचिन मोरे, काळुराम चौधरी, गणेश गडदरे, गणेश केसकर, सरपंच तेजश्री काकडे, दत्ता चव्हाण, डॉ. वसंतराव दगडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी या घटनेचा निषेध नोंदवला.
कार्यक्रमाचे प्रस्तविक विक्रम दगडे यांनी केले तर सूत्रसंचालन विष्णू गडदरे यांनी केले आणि आभार अनंता शिंदे यांनी मानले. नीरा बंद यशस्वी झाला असून यामुळे परिसरात एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. ओबीसी समाजाने एकजुटीने दाखवलेला हा निषेध लक्षवेधी ठरला असून या प्रकरणाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.